बॅटऱ्या चोरणारी टोळी गजाआड; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोले तालुक्यातील (Akole Taluka) राजूर परिसरात वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला गजाआड करण्यात राजूर पोलिसांना यश आले आहे.

  अकोले / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अकोले तालुक्यातील (Akole Taluka) राजूर परिसरात वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला गजाआड करण्यात राजूर पोलिसांना यश आले आहे. घरगुती वापराच्या तसेच वाहनांच्या बॅटऱ्या चोरीचे सत्र राजूर परिसरात सुरू होते.

  राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस कॉन्स्टेबल फटांगरे हे रात्रीची गस्त करत असताना त्यांना पाचनई येथील सुदाम बादड याच्या घरात चोरीची बॅटरी लपून ठेवल्याची माहिती मिळाली. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीची बॅटरी मिळून आली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली.

  हे आहेत आरोपी

  सुदाम सखाराम बादड, समीर विठल भारमल (दोघेही रा.पाचनई), अजय उर्फ लाला विष्णु भांगरे, दिलीप विष्णु भांगरे, मचिंद्र बुधा डोंगिरे, मिलींद भिमा मडके, अनिल भिमा मडके (सर्व रा. राजूर) अशी अटेकतील बॅटरी चोरांची नावे आहेत. त्यांनी चोऱ्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून आयशर टेम्पोची बॅटरी, टॅक्ट्ररची बॅटरी, ताब्यांचा बंब, सोलर पॅनलची प्लेट, तसेच चोरी करण्यासाठी वापरलेली मारूती व्हॅन असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

  संशयितासंबंधी माहिती मिळाल्यास संपर्क साधा

  गावात किंवा परिसरात कोठेही संशयित व्यक्ती दिसून आल्यास तसेच चोरी करणाऱ्या व्यक्ती/टोळीबाबत काहीही माहिती असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

  – नरेंद्र साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक