‘आर्या’ने प्रसंगावधान राखत वाचविले आईचे प्राण!

श्री व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी संचलित स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडिअम स्कूलमधील सातवीची विद्यार्थिनी आर्या सुनील नवले हिने आपल्या आईला प्रसंगावधान राखून वाचविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    संगमनेर : येथील श्री व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी संचलित स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडिअम स्कूलमधील सातवीची विद्यार्थिनी आर्या सुनील नवले हिने आपल्या आईला प्रसंगावधान राखून वाचविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    दोघीही रस्त्यावर पडल्या

    आर्या ही आई मनीषा नवले यांच्यासोबत मोपेडवरुन संगमनेर-नाशिक रस्त्यावरून जात होत्या. त्यावेळी परिवार किराणा समोरून संगमनेरकडे जात असताना चुकीच्या दिशेने एक स्त्री आली. यामुळे संगमनेरकडे जाणार्या एक ट्रक व ती स्त्री यामध्ये आर्या व तिची आई यांची मोपेड अडकली. त्याचवेळी समोरून येणार्या गाडीला वाचविण्यासाठी आर्याच्या आईने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु या गडबडीत दोघीही रस्त्यावर पडल्या.

    स्कूलकडून वीरश्री उपाधी

    पाठीमागून येणाऱ्या ट्रक समोरच आई पडली हे पाहून क्षणार्धात आर्याने आईला आपल्या बाजूला ओढले. त्यामुळे आईचा जीव थोडक्यात बचावला. या प्रसंगावधानामुळे फक्त एका हाताच्या बोटांवरून ट्रकचे टायर गेले. जीवावर बेतलेल्या या प्रसंगात आर्याच्या धाडसी निर्णयाने आईचे प्राण वाचले. याबद्दल स्ट्रॉबेरी स्कूलच्या संस्थापिका संज्योत वैद्य यांनी तिचे अभिनंदन केले व तिला यावर्षीची वीरश्री उपाधी दिली.