‘वाद टाळून एकत्र या’; शरद पवार यांचे श्रीगोंद्यातील नेत्यांना आवाहन

नागवडे कारखाना निवडणुक प्रक्रिया सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पवारांनी केलेल्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले असून, या विधानातून त्यांनी एकप्रकारे नागवडे यांना झालेल्या चूका दुरुस्त करण्याचा व उपाध्यक्ष केशव मगर यांना वाद टाळत एकत्र येण्याचाच सल्ला दिल्याची चर्चा सुरू झाली.

    श्रीगोंदा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : काही चुका झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करा, वाद टाळून एकत्र या असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीगोंदा कारखान्यावर झालेल्या जाहीर सभेत (Sharad Pawar in Shrigonda) केले. नागवडे कारखाना निवडणुक प्रक्रिया सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पवारांनी केलेल्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले असून, या विधानातून त्यांनी एकप्रकारे नागवडे यांना झालेल्या चूका दुरुस्त करण्याचा व उपाध्यक्ष केशव मगर यांना वाद टाळत एकत्र येण्याचाच सल्ला दिल्याची चर्चा सुरू झाली.

    नागवडे सहकारी साखर कारखान्यावर उभारण्यात आलेल्या स्व. शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पूणार्कृती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार निलेश लंके, आमदार अशोक पवार, आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, भानुदास मुरकुटे, आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे एमडी रमाकांत नाईक तसेच संचालक यांच्यासह तालुक्यातील, जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच हजारोंच्या संख्येने जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. संचालक सुभाष काका शिंदे यांनी आभार मानले. नगर येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमात सत्काराला पूर्णपणे फाटा देण्यात आला तसेच दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    तीन आठवड्यात कुकडी प्रश्नी तोडगा

    कुकडी प्रश्न सोडवण्यासाठी नातू आमदार रोहित पवार यांच्यासह श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच नेतेमंडळी आग्रही आहेत. त्यामुळे येत्या दोन ते तीन आठवड्यात या प्रश्नावर बैठक घेऊन कुकडीप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. पाणीप्रश्नावर नगर जिल्ह्यात कायम वाद व्हायचा पूर्वी नगर-नाशिक असा वाद व्हायचा याचे उदाहरण देताना त्यांनी नगर जिल्ह्यात लग्नानंतर भाषणाची प्रथा आहे. त्यात पाण्याचा मुद्दा उपस्थित व्हायचा असे शरद पवार यांनी सांगितले.

    प्रत्येकाच्या अंत:करणात बापू आहेत. त्याचच प्रतीक म्हणून पुतळा उभारण्यात आला. जुन्या नेत्यांमध्ये तसेच सहकार टिकवण्यामध्ये स्व. शिवाजी बापूंचे नाव अग्रस्थानी आहेत. स्व. कुंडलीकराव जगताप यांनी कुकडी कारखाण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे मंजुरी मिळावी यासाठी साकडे घातले होते. त्यावेळी बापूं आमदार असल्यामुळे त्यांची मर्जी विचारण्यात आली तेव्हा बापूंनी कोणतही स्वार्थ न पहाता कारखाना मागतायेत तर मग देऊन टाका असे मोकळ्यामनाने सांगितले होते.

    – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री.