
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिर्डी शाखेचे सदस्य असलेले शासकीय वैद्यकीय अधिकारी स्व. डॉ. देविदास लव्हाटे यांचे कोरोनाकाळात निधन झाल्याने इंडियन मेडिकल असोसिशनच्या शिर्डी शाखेने स्व. डॉ. लव्हाटे यांच्या पत्नी रेश्मा लव्हाटे यांना १० लाखांचा धनादेश सुपुर्त केला.
अहमदनगर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिर्डी शाखेचे सदस्य असलेले शासकीय वैद्यकीय अधिकारी स्व. डॉ. देविदास लव्हाटे यांचे कोरोनाकाळात निधन झाल्याने इंडियन मेडिकल असोसिशनच्या शिर्डी शाखेने स्व. डॉ. लव्हाटे यांच्या पत्नी रेश्मा लव्हाटे यांना १० लाखांचा धनादेश सुपुर्त केला.
डॉ. देविदास लव्हाटे हे नगर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात कोविड काळात कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत असताना ते कोव्हिड संक्रमित झाले. त्यांना त्वरित उपचारासाठी जिल्हा कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. याकालातही त्यांनी अनेक रुग्णांना धीर देण्याचे काम केले. मात्र, उपचारादम्यान त्यांची प्रकृती गंभीर होऊन कोरोना विषाणू सोबत चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली व त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलीच्या भविष्यासाठी देशभरातील डॉक्टरांची अग्रगण्य संघटना म्हणून कार्यरत असलेल्या आय.एम.ए च्या शिर्डी शाखेचे अध्यक्ष व साईबाबा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.प्रीतम वडगावे, सचिव डॉ. स्वाधीन गाडेकर, उपाध्यक्ष डॉ. मधुरा जोशी, कोषाध्यक्ष डॉ. देवराम तांबे, मार्गदर्शक डॉ. दत्ता कानडे, डॉ. विजय नरोडे, डॉ. दीपक कांदळकर, डॉ. रवींद्र अंत्रे यांनी आंतरराष्ट्रिय कोषाध्यक्ष डॉ. रवींद्र वानखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून आय.एम.ए चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सहजानंद सिंग, राष्ट्रीय सचिन डॉ. जयेश लेले यांचेकडून धनादेश मंजूर करून घेतला.
शिर्डी येथे झालेल्या वैद्यकिय प्रशिक्षण शिबिरात सदरचा धनादेश रेश्मा लव्हाटे यांना प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. गौरव वर्मा यांचे प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
यावेळी शिर्डी-राहाता परिसरातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय व्यवसायिक उपस्थित होते.