डोळासणे येथील ब्रिटीशकालीन विश्रामगृह मोजतेय अखेरच्या घटका!

लवकरात लवकर पुनर्वैभव प्राप्त करुन देण्याची पठारभागातील नागरिकांची मागणी

संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील डोळासणे येथील ब्रिटीशकालीन शासकीय विश्रामगृह आज अखेरच्या घटका मोजत आहे. एकेकाळी संपूर्ण पठारभागावर येथून ब्रिटीश अधिकारी नियंत्रण ठेवत होते. मात्र, आज संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे विश्रामगृह जीर्ण झाले असून, दिमाखदार वास्तू कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता तरी झोपेचे सोंग घेतलेल्या संबंधित विभागाने जागे होऊन ब्रिटीशकालीन विश्रामगृहाची दुरुस्ती करुन पुनर्वैभव प्राप्त करुन द्यावे, अशी मागणी पठारभागातून होत आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असणार्‍या डोळासणे येथे ब्रिटीश अधिकार्‍यांनी संपूर्ण पठारभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी या विश्रामगृहाची निर्मिती केल्याचा इतिहास आहे. त्यावेळी पठारभागातील शेतसारा गोळा करण्याचे हे प्रमुख केंद्र होते. त्यावेळेस नियंत्रण ठेवण्यासाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने येथील विश्रामगृहामध्ये तबेलाही बांधण्यात आलेला होता. विशेष म्हणजे ब्रिटीश अधिकार्‍यांना आराम करण्याच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेऊन विश्रामगृहाची रचना करण्यात आलेली होती. परंतु, आजमितीला संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे विश्रामगृह जीर्णावस्थेत गेले आहे. कोणत्याही क्षणी विश्रामगृह कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. तर संपूर्ण परिसरात गवत आणि झाडांचे साम्राज्य पसरल्याने विश्रामृहाच्या सौंदर्याला बाधा पोहोचली आहे.

ब्रिटीशांनी दीडशे वर्ष भारतावर राज्य केले. याकाळात त्यांनी मुंबईतील रेल्वेस्थानक, न्यायालय, गेट वे ऑफ इंडिया, संसद, राष्ट्रपती भवन अशा विविध दिमाखदार वास्तूंची निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातही साम्राज्याचा विस्तार झाल्याने तेथेही नियंत्रणासाठी वास्तूंची निर्मिती केली होती. त्यातील काही वास्तू आजही मोठ्या दिमाखात उभ्या राहत आहेत. तर काही वास्तू जीर्ण झाल्याने अखेरच्या घटका मोजत आहे. यामध्ये डोळासणे येथील विश्रामगृहाचाही समावेश आहे. त्यामुळे आता तरी संबंधित विभागाने जागे होऊन विश्रामगृहास पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पठारभागातील नागरिकांनी केली आहे.