
नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमधील कोरोना आयसीयू कक्षाला आग लागून ११ जणांच्या मृत्यू प्रकरणात सिव्हील सर्जनसह सहा जणांविरोधात कारवाई करण्यात आल्यानंतर कर्मचारी संघटनेपाठोपाठ डॉक्टर संघटनाही आक्रमक झाली आहे.
अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमधील कोरोना आयसीयू कक्षाला आग लागून ११ जणांच्या मृत्यू प्रकरणात सिव्हील सर्जनसह सहा जणांविरोधात कारवाई करण्यात आल्यानंतर कर्मचारी संघटनेपाठोपाठ डॉक्टर संघटनाही आक्रमक झाली आहे. निलंबन चुकीचे असल्याचा आरोप करत डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
सिव्हील हॉस्पिटलमधील कोरोना आयसीयू कक्षाला आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सिव्हील सर्जनसह चौघांचे निलंबन तर दोघी नर्सची सेवा समाप्त करण्यात आली. बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाचे कामकाज बंद करून त्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्याने जिल्हा रूग्णालयातील तातडीची सेवा वगळता सर्व विभाग बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांवर गुन्हा दाखल करणे, त्यांना अटक करणे ही कारवाई अत्यंत चुकीची व अन्यायकारक आहे. त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा. अन्यथा राज्यभर महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी संघटना, राज्य शासन आरोग्य कर्मचारी संघटना यांच्या मार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
आम्हाला दाेषी धरू नका
आग लागून जी दुर्घटना झाली. त्याचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. आरोग्य विभाग व विविध तांत्रिक विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. मृतांची उत्तरीय तपासणी झाली असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. आगीच्या कारणाचा शोध सुरु आहे. सदोष साहित्य वापरल्यामुळे धूर सर्वत्र पसरला असावा व त्यामुळे रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला.
अतिदक्षता विभागात पसरताच सर्व कर्मचारी तेथे मदतीसाठी धावून आले. स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना बाहेर काढले. आग आणखी पसरू नये म्हणून मुख्य प्राणवायू पुरवठा खंडित करावा लागला. वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांनी रुग्णसेवेच्या कामामध्ये हलगर्जीपणा केलेला नाही. त्यामुळे डॉक्टर व परिचारिका यांना दोषी मानता येऊ शकत नाही, असे यावेळी सांगण्यात आले.