राहाता तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारावी; राष्ट्रवादीच्या निलेश कोते यांचे उद्योगमंत्र्यांना साकडे

    शिर्डी : राहाता तालुक्यासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव व शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते (Nilesh Kote) यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्याकडे केली आहे.

    या संदर्भात निवेदन देण्याबरोबरच कोते यांनी उद्योगमंत्र्याशी संवादही साधला आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे. या आधारावर परिसरात लहानमोठ्या बाजारपेठा आहेत. तालुक्यातही राहाता, कोल्हार, लोणी बाजारपेठा आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी बघता केवळ यावर अवलंबून न राहाता तालुक्यासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

    या परिसरातील गरजू, होतकरू, कष्टाळू तरूणांना रोजगारासाठी अन्य शहरे गाठावी लागत आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेर, नगर, राहुरी, श्रीरामपूरप्रमाणे राहाता तालुक्यातही औद्योगिक वसाहतीची स्थापना करावी. येथे रेल्वे, विमान, समृद्धी महामार्ग अशा दळणवळणाच्या उत्तम सोई निर्माण झाल्याने येथे उद्योग व्यवसायाच्या वाढीला चालना मिळणार आहे.

    अनेक उद्योजक साई भक्त असल्याने शासनाने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास सॉफ्टवेअर इंडस्ट्री किंवा आयटी पार्क उभारला जावू शकतो. यामुळे परिसरातील शिक्षित तरुणांना स्थानिक पातळीवरच उत्तम संधी प्राप्त होईल. या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यात औद्योगिक वसाहत असावी, अशा प्रकारची मागणी करत तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी निलेश कोते यांनी केली आहे.