माजी नगरसेवकासह तीन जणांविरोधात सावकारकीचा गुन्हा दाखल

    जामखेड : जामखेड येथील खाजगी सावकाराकडून व्याजाने घेतलेले एक लाख रुपये परत न दिल्याने आरोपींनी फिर्यादीचे चारचाकी व एक दुचाकी वाहने पळवून नेले. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला शनिवारी (दि.२५) एका माजी नगरसेवकासह एकूण तीन जणांवर खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २३ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक आरोपी संदिप सुरेश गायकवाड, शेखर बाळू रिटे (रा. गोरोबा टाकीजवळ जामखेड) व अनोळखी इसम या तिघांनी फिर्यादी अशोक दत्ता बोबडे (वय २२ रा. पिंपळगाव आळवा) याच्या घरी गेले व म्हणाले की, तुला दिलेले एक लाख रुपये आताच्या आता परत दे यावर फिर्यादी म्हणाला की आता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. दोन दिवसांनी तुमचे पैसे देतो. यावर आरोपींनी कुठलीही सबब ऐकून न घेता फिर्यादीची दारासमोर असलेली टाटा कंपनीचा छोटा हत्ती (एमएच१६ सीसी. २२३९) एक लाख पन्नास हजार व हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १६ सीआर ९००८) या गाडीची किंमत चाळीस हजार रुपये अशा दोन्ही गाड्यांची चावी जबरदस्तीने घेऊन गेले. त्यावर फिर्यादीने विचारणा केली असता आरोपींनी सांगितले की दोन्ही गाड्या विकून टाकल्या आहेत.

    तसेच आरोपींनी फिर्यादीच्या घरातील नातेवाईकांचे मतदान यादीत नाव टाकतो असे खोटे बोलून त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड देखील घेऊन गेले आहेत. या कागदपत्रांचा दुरूपयोग होण्याची शक्यता आहे, असे याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला फिर्यादी अशोक दत्ता बोबडे याने म्हटले आहे. या प्रकरणी दि. २५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी माजी नगरसेवक संदिप सुरेश गायकवाड, शेखर बाळू रिटे व एक अनोळखी अशा तिघांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील बडे हे करत आहेत.