वीज चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने १४ सप्टेंबरला गाळ्यातील वीज मीटरची तपासणी केली होती. त्यावेळी मीटर नॉट डिस्प्ले दाखवत होते. त्यामुळे ते काढून तपासणीसाठी पाठविण्यात आले.

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : भाडोत्री दिलेल्या गाळ्यात वीज चोरी (Power Theft) प्रकरणी गाळा मालकांसह भाडेकरूविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र रामभाऊ ताठे असे मालकाचे नाव असून, संतोष राजू ढवळे असे आरोपी भाडेकरूचे नाव आहे.

    ताठे यांचा मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात गाळा आहे. तो गाळा त्यांनी ढवळे यास भाड्याने दिलेला होता. महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने १४ सप्टेंबरला गाळ्यातील वीज मीटरची तपासणी केली होती. त्यावेळी मीटर नॉट डिस्प्ले दाखवत होते. त्यामुळे ते काढून तपासणीसाठी पाठविण्यात आले. मीटरमधील टर्मिनलजवळ छिद्र पाडून फेरफार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर वीज चोरीचा प्रकार उजेडात आला.

    १९ लाखांची चोरी ४५ हजार तडजोड

    मीटरमधून ९४ हजार ७३४ युनिट वीज चोरी करण्यात आली. ऑगस्ट २०१७ पासून ही चोरी सुरू होती. त्याची किंमत १९ लाख ६५ हजार रूपये इतकी होते. तडजोडीअंती ती ४५ हजार रुपये करण्यात आली. ही रक्कम भरण्यासाठी ढवळे यांना आठवडाभराची मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत रक्कम न भरल्याने अखेर भरारी पथकाचे प्रमुख प्रदीप सावंत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.