अहमदनगरमध्ये  जिल्हा रुग्णालयाला भीषण आग, दहा जणांचा मृत्यू, आयसीयू जळून खाक

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला शनिवारी सकाळी भीषण आग लागली आहे. रुग्णालयातील आयसीयू विभागातच ही आग लागली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

    अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला शनिवारी सकाळी भीषण आग लागली आहे. रुग्णालयातील आयसीयू विभागातच ही आग लागली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

    जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूत अनेक रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. आग लागल्याचे समजताच रुग्णलायातील कर्मचाऱ्यांनी रुग्णांना दुसरीकडे हलविण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी झालेल्या गोंधळात दहा रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. आगीचे वृत्त कळताच स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

    सकाळी ११.३० च्या सुमारास ही आग लागली. ही ग जेल्हा लागली तेव्हा आयसीयूत २० जण उपस्थित होते. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्व रुग्णांना सुरक्षित वॉर्डमध्ये नेले. ज्या वॉर्डला आग लागली, तो वॉर्ड हॉस्पिटलच्या अगदी मधोमध आहे.

    घटनास्थळी पोहचलेले अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पोलीस आणि हॉस्पिटलचे कर्मचारीही मदतकार्यात सहभागी आहेत. प्राथमिक निष्कर्षानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापपर्यंत आगीचे अधिकृत कारण समोर आलेले नाही.

    हॉस्पिटलमधील आगीत मृत्यु झालेल्यांची नावे

    रामकिसन विठ्ठल हरपुडे( वय ७०), सिताराम दगडू जाधव (८३), सत्यभामा शिवाजी घोडचौरे( ६५)य, कडूबाळ गंगाधर खाटीक (६५), शिवाजी सदाशिव पवार (८२) , दीपक विश्वनाथ जेडगुले (५७), कोंडाबाई मधुकर कदम (७०), आसराबाई नांगरे (५८ ), छबाबी अहमद सय्यद (६५) व एक अनोळखी , चार महिला व सहा पुरुष अशा दहा जणांचा मृत्यू

    दरम्यान अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने अहमदनगरच्या दिशेने निघाले आहेत. अहमदनगर याठिकाणी लागलेल्या आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती, घटनास्थळी जाऊन पाहणी केली जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईक यांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार असही ते म्हणाले.