दुधात तेल व पावडर टाकत असल्याची एफडीएला मिळाली माहिती अन् मग…

भेसळयुक्त दुधाचा (Adulterated Milk) गोरख धंदा करणाऱ्या संकलन केंद्रावर छापा टाकत दुधाचे साहित्य जप्त करण्यात आले. अकोले तालुक्यातील जांभळे येथे ही छापेमारी झाली.

    अकोले / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : भेसळयुक्त दुधाचा (Adulterated Milk) गोरख धंदा करणाऱ्या संकलन केंद्रावर छापा टाकत दुधाचे साहित्य जप्त करण्यात आले. अकोले तालुक्यातील जांभळे येथे ही छापेमारी झाली. दूध संकलन करणारा योगेश चव्हाण हा दुधात तेल व पावडर भेसळ करुन दूध संकलन करत असल्याचे तक्रारीवरून अहमदनगर अन्न व औषध प्रशासन विभागाने (Food and Drug Administration) छापा टाकून १५ गोणी पावडर व तेल ड्रम साठा हस्तगत केला आहे.

    अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे त्याचे पथक व अकोले प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक हांडोरे बी. बी. यांच्या पथकाने अकोले तालुक्यातील जांभळे येथील शिंदेवाडीत छापा टाकला. योगेश चव्हाण हा दुधात भेसळ करत असल्याचे माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार चव्हाण याचे घरी आज बुधवारी  (दि.२२) सकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा मारला असता तेथे दुधात भेसळ करण्यासाठीचे १५ गोणी पावडर, तेल ड्रमसह साहित्य आढळले. त्यातील  ४० लिटर दुधातून सँपल घेतले तर तो चालवत असलेले जांभळे येथील संकलन केंद्रावरही छापा मारला. तेथील सुमारे १ हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले.

    नमुने तपासणीनंतर गुन्हा

    अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यात घेऊन सॅम्पल तपासणीसाठी घेतले. या सँपलचा अहवाल आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक बी. बी. हांडोरे, गणेश शिंदे, विठ्ठल शरमाळे, क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.