भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा महावितरणच्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

माजी आमदार मुरकुटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास विनंती केली की, आज शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकऱ्याकडे कुठलेही पिक सध्या हातात नाही. साखर कारखाने नुकतेच चालू झाल्यामुळे अजून शेतकऱ्याकडे ऊसाचेही पेमेंट आले नाही. त्यामुळे आम्हाला एक महिन्याची मुदत द्यावी. मात्र, वीज कंपनीचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे वातावरण तापले.

    अहमदनगर – भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. नेवासा येथे वीज तोडणीविरोधात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत होते. मात्र, मागणी मान्य होत नसल्यामुळे मुरकुटे यांनी हे पाऊल उचलले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    नेवासा तालुक्यात महावितरण विभागाकडून वीजबिल थकवणाऱ्यांविरोधात कृषीपंप वीज तोडणी कारवाई सुरु आहे. या कारवाईविरोधात मुरकुटेंच्या नेतृत्वात नेवासा वीज वितरण कार्यालयात भाजपनं चार तास ठिय्या आंदोलन केलं. शेतकऱ्याकडून ५ हजार रुपये न घेता ३ हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली. मात्र अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवल्याने भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच फाशी घेण्याचा प्रयत्न केला.

    माजी आमदार मुरकुटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास विनंती केली की, आज शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकऱ्याकडे कुठलेही पिक सध्या हातात नाही. साखर कारखाने नुकतेच चालू झाल्यामुळे अजून शेतकऱ्याकडे ऊसाचेही पेमेंट आले नाही. त्यामुळे आम्हाला एक महिन्याची मुदत द्यावी. मात्र, वीज कंपनीचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे वातावरण तापले.

    यावेळी तिथे उपस्थित इतर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी मुरकुटेंना रोखण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून घडल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.