माजी आमदार मुरकुटेंनी ‘अशोक’वरून साधला विरोधकांवर निशाणा; म्हणाले…

पावसाळी छत्रीसारख्या वर्ष सहा महिन्यातून उगविणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व हितरक्षक नेत्यांनी 'अशोक'ची उठाठेव व कुरापती वगळता शेतकऱ्यांसाठी काय केले, असा परखड सवाल माजी आमदार भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) यांनी केला. 

    श्रीरामपूर : आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीत पाटपाणी, खंडकरी शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलने केली, चळवळी केल्या, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, प्रसंगी तुरुंगातही गेलो. तसे पावसाळी छत्रीसारख्या वर्ष सहा महिन्यातून उगविणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व हितरक्षक नेत्यांनी ‘अशोक’ची उठाठेव व कुरापती वगळता शेतकऱ्यांसाठी काय केले, असा परखड सवाल माजी आमदार भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) यांनी केला.
    अशोक कारखाना निवडणुकीतील लोकसेवा विकास आघाडीच्या प्रचारसभेत मुरकुटे बोलत होते. मुरकुटे म्हणाले की, एरवी शहरात ऐश आरामात राहायचे आणि वर्ष सहा महिन्यातून सवडीनुसार श्रीरामपूरला यायचे आणि आम्हीच शेतकऱ्यांचे कैवारी आहे, असा आव आणायचा ही विरोधी नेत्यांची नीती आहे. तालुक्यातील जनतेच्या वा शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला ज्यांना फुरसत मिळत नाही. ते आता ‘अशोक’च्या निवडणुकीत ऐनवेळी अवतरुन शेतकऱ्यांचे हितरक्षक असल्याचा आव आणत आहे. यांचा हा हंगामी कळवळा म्हणजे बगळ्याचे ध्यान असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.
    आम्ही सन १९८० पासून राजकारणात आहोत. तेव्हापासून आम्ही तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखाशी समरस झालो आहोत. भंडारदरा धरणाचे हक्काचे पाण्याचा प्रश्न, खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ असो अथवा शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न त्यासाठी आम्ही चळवळी केल्या. संघर्ष करुन लढा उभारला.वेळप्रसंगी तुरुंगवासही भोगला. संघर्ष करताना राजकीय तडजोडी केल्या नाहित. वेळप्रसंगी स्वपक्षियांशी संघर्ष करताना डगमगलो नाही. हा सगळा ईतिहास जनतेला ठाऊक आहे. शेतकऱ्यांचे कैवार दाखविणारे ह्या संघर्षाच्यावेळी कुठे होते, असा सवाल मुरकुटे यांनी केला.
    अशोक कारखान्याच्या कारभारावर बोलण्याचा यांना काहीच अधिकार नाही. अशोक कारखान्याच्या कारभारात काही गैर असते तर सभासदांनी पस्तीस वर्षे आमच्यावर विश्वास दाखविला नसता. ऊस भावाबाबत खोटीनाटी आकडेवारी सांगून दिशाभूल करायची आणि साप म्हणत भुई थोपटायची ही काही शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची नीती आहे. अशोक कारखान्याने आजतागायत जिल्ह्यातील चांगल्या कारखान्यांच्या बरोबरीने भाव दिला आहे.