हे आघाडी नाही तर बिघाडीचे सरकार : माजी आमदार कोल्हे

    कोेपरगाव : राज्यातील महाविकास आघाडी जुगाड बिघाडीचे सरकार असून बाराबलुतेदारांना ते पूर्णपणे विसरले आहेत. इतर मागासवर्गीय ओबींसींचे राजकीय आरक्षण काढून घेतले तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, नाकर्त्या शासनाचा आम्ही निषेध करतो. संघर्षाने प्रश्न मांडून भांडल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही. सत्तेतील मंत्री खुर्च्या वाचविण्याचे काम करत आहे. गोरगरीब व ओबीसींविरूध्द होणारा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही, असे भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.

    कोपरगाव शहर, तालुका भारतीय जनता पक्ष व सर्व सेलच्या वतीने महाविकास आघाडी शासनाने ओबीसी वर्गाचे आरक्षण रद्द केले. त्या निषेधार्थ व सिंचन पाण्याचे आर्वतन, खरीप पिक विमा, आणि शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीतपणे मिळावा, यासाठी येथील साईबाबा काॅर्नरवर शनिवारी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

    छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले. गटनेते रविंद्र पाठक व शहराध्यक्ष डी आर काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, कोल्हे कारखान्यांचे संचालक प्रदिप नवले, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपसभापती वैशाली साळूंके, रिपाईचे जितेंद्र रणशुर, भाजपा उपाध्यक्ष प्रभाकर शिंदे, नगरपालिका शिक्षण मंडळाचे विनोद राक्षे, माजी सभापती मच्छिंद्र केकाण, सुनिल देवकर, माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर यांनी नाकर्त्या महाविकास आघाडी शासनाचा निषेध नोंदवत ओबीसी वर्गाचे आरक्षण पूर्ववत मिळालेच पाहिजे अशी मागणी केली.

    विवेक कोल्हे म्हणाले, कोरोना काळात महाविकास आघाडी शासनाने असंख्य चुकीचे निर्णय घेतल्याने त्याची शिक्षा आपण भोगत आहोत. ओबीसी वर्गाचे आरक्षण काढून त्यांच्यावर अन्याय कराल तर त्याची पहिली ठिणगी कोपरगावातून पडेल आणि त्याचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरेल असा इशारा देऊन येथील सत्ताधारी फोटो आणि खोटे सम्राट आमदारांनी कोपरगाव शहरवासियांचे थेट निळवंडेतून बंद पाईपलाईनद्वारे येणारे पाणी बंद केले आणि नागपुर समृध्दी महामार्गाची स्मार्टसिटी घालविण्यांचे पाप केले. त्याची माफी साईबाबा दरबारी मागून ती पूर्ववत करावी, असेही ते म्हणाले.