पैसे घेऊन लग्न करायचे अन् काही दिवसांनी फरार व्हायचे; दलालांचा भांडाफोड

    श्रीगोंदा : पैसे घेऊन लग्न करायचे अन् काही दिवसांनी नवरीने पसार व्हायचे. लग्नासाठी नवरदेवाकडून पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या दलालांच्या टोळीचा हा उद्योग श्रीगोंदा तालुक्यात उजेडात आला आहे. पसार होण्याच्या बेतात असलेली नवरी मुलगी थेट पोलिसांत पोहचल्याने दलालांचा भांडाफोड झाला.

    श्रीगोंद्यातील दलाल फरार

    तरुण मुलींना हाताशी धरून लग्न न जमणाऱ्या मुलाचा शोध दलालाकडून घेतला जातो. लग्नासाठी मुलगी आहे पण पैसे द्यावे लागतील, असे सांगून नवऱ्या मुलाकडून लाखो रुपये उकळतात. त्यातील काही पैसे नवऱ्या मुलीला दिले जातात. लग्नासाठी नवरीचे बोगस नातेवाईक हे दलाल उभे करतात. लग्नांतर काही दिवसातच नवऱ्या मुलीचे खरे रूप समोर येते. जबरदस्ती लग्न केलं, फसवलं किंवा कौटुंबिक छळ असे आरोप नवऱ्या मुलाच्या कुटुंबियांवर करून पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देऊन मुलगी दलालांसोबत पळ काढते. बदनामीच्या भीतीने कोणी याची पोलिसात कोणी तक्रार करत नाही. श्रीगोंद्यात विवाहाच्या नावाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलाल टोळीचा पदार्फाश होताच श्रीगोंद्यातील दलाल फरार झाला आहे.

    स्थळ दाखविण्यासाठी घेतले दोन लाख

    आठ दिवसांपूर्वी श्रीगोंद्यातील एका दलालाच्या मदतीने एका तरुणाचा विवाह झाला. नवऱ्या मुलीचे स्थळ दाखविण्यासाठी नवऱ्या मुलाच्या कुटुंबियांकडून दलालाने दोन लाख रुपये घेतले. नवऱ्या मुलीची आई आजारी असून वडील वारले आहेत. त्यामुळे मुलीची मावशी फक्त लग्नाला उपस्थित राहील, असे नवरदेवाच्या घरच्यांना सांगण्यात आले होते. लग्नानंतर काही दिवसातच वधूने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. विवाहित तरुणी ही सतत फोनवर एका वेगळ्या पद्धतीने बोलत असल्याने तिच्यावर संशय आला. तिचा मोबाईल काढून घेताच ठग वधूने आकांडतांडव करायला सुरुवात केली. त्याचा हा अवतार पाहून नवऱ्या मुलाच्या कुटुंबियांनी तिला श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणले.