‘आता जगावं तरी कसं?’ तांगडी येथील शेतकर्‍यांचा उद्विग्न सवाल ;कोरोना विषाणूबरोबर आता टोमॅटोवर अनोख्या विषाणूचा प्रादुर्भाव

राजू नरवडे , संगमनेर : टोमॅटो पिकावर आलेल्या अनोख्या विषाणू (व्हायरस)मुळे संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या तांगडी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आधीच कोरोना संकट व निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना पुन्हा मोठ्या धाडसाने घेतलेल्या टोमॅटो पिकावर विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने ‘आता जगावं तरी कसं?’ असा उद्विग्न सवाल शेतकरी करत आहे.

तांगडी येथील अर्जुन गाडेकर, सुयोग गडगे, निवृत्ती तांगडकर, राजेंद्र गडगे, ज्ञानदेव गाडेकर या शेतकर्‍यांनी आपापल्या शेतात गेल्या दोन-अडीच महिन्यांपूर्वी टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. पीक जोमात यावे म्हणून शेतकर्‍यांनी महागड्या खते व औषधांचा वापर केल्याने पीक अतिशय जोमदार येवून झाडांना मोठ्या प्रमाणात टोमॅटो आले आहेत. त्याच बरोबर झाडेही डोक्याबरोबर आली आहेत. मात्र, अचानक संपूर्ण पिकावर अनोख्या पद्धतीच्या विषाणूचा (व्हायरस) प्रादुर्भाव होवून फळ अतिशय कडक बनून आतमधूनही काळी पडत आहेत.त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांचा तोंडचा घास पळाला आहे.

यासंदर्भात  शेतकर्‍यांनी संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांकडे तक्रारीही केल्या होत्या. त्यानंतर कंपनीच्या अधिकार्‍यांनी पाहणीही केली. मात्र काहीच उपयोग झाला नाही. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आता चांगलेच चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या टोमॅटोला बाजारभावही चांगले आहेत. त्यानुसार चांगले पैसे होतील या भाबड्या आशेवर पूर्वपणे पाणी फिरले आहे.

टोमॅटो पिकासाठी प्रत्येक शेतकर्‍याचा सुरूवातीपासून ते आत्तापर्यंत एकरी दोन लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला आहे. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पोटच्या मुलांप्रमाणे पिकाची काळजी घेतली. मात्र हातातोंडाशी आलेला घास अनोख्या विषाणूने हिरावून नेल्याने आम्ही जगावं की मरावं असा उद्विग्न सवाल शेतकर्‍यांनी विचारला आहे.

यावर्षी मी एक एकर शेतात टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. त्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. परंतु टोमॅटो पिकावर आलेल्या अनोख्या व्हायरसने सर्व फळे खराब झाली आहेत. यावर्षी आम्ही दिवाळीही केली नसून सर्व भांडवल टोमॅटो पिकाला लावले होते. परंतु, या व्हायरसने हातातोंडाशी आलेला घासही हिरावून नेला आहे.

- अर्जुन गाडेकर (टोमॅटो उत्पादक, तांगडी)