प्रतीक काळे आत्महत्येप्रकरणी मंत्री गडाखांची चौकशी करा; भाजप आमदाराची मागणी

प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी (Pratik Kale Suicide Case) पोलीस दबावात असून, आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिकने व्हॉट्सऍप मेसेज, ऑडिओ-व्हिडीओ क्लिपमध्ये जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, त्यांच्या पत्नी सुनीता तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत.

  अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी (Pratik Kale Suicide Case) पोलीस दबावात असून, आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिकने व्हॉट्सऍप मेसेज, ऑडिओ-व्हिडीओ क्लिपमध्ये जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, त्यांच्या पत्नी सुनीता तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी शंकरराव गडाख यांची पोलिसांनी चौकशी करावी, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली.

  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरमध्ये सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी माजी आमदार मुरकुटे यांनी गडाख कुटुंबावर अनेक आरोप केले. मागील वर्षी गडाख कुटुंबातील एका महिलेने आत्महत्या केली होती. त्याचे पुढे काय झाले? असा सवाल करत त्यावर पोलीस प्रशासनाने प्रकाश टाकावा आणि प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी मंत्री असले म्हणून शंकरराव गडाख यांच्या दबावात न येता कार्यवाही करून चौकशी करावी, अशी मागणीही मुरकुटे यांनी केली.

  माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, संजय सुखदान, योगेश साठे, फिरोज पठाण, संजय जगताप, जीवन पारधे, भाऊ साळवे यावेळी पस्थित होते.

  सुखदान यांना गडाखांकडून मुद्दाम त्रास

  वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय लक्ष्मण सुखदान यांच्यावर राजकीय द्वेषातून शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख हे अन्याय करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने केला. आंदोलनात सहभागी झालेल्या वंचितच्या नेत्यांनी मंत्री गडाख यांच्यावर जोरदार टीका केली. सुखदान हे वंचित बहुजन आघाडीचे काम करत असल्याने मंत्री गडाख त्यांना मुद्दाम त्रास देत आहेत. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्याचा निषेध करण्यात आला.

  पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त

  वंचितच्या आंदोलनादरम्यान एसपी कार्यालयाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त होता. रास्ता रोको केल्यामुळे औरंगाबाद, मनमाड, पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलनात संगमनेर, औरंगाबाद, नेवासे व अहमदनगर शहरातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. मंत्री गडाख यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.