
श्रीरामपूर तालुक्यातील अशोक आणि श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी व श्रीगोंदा साखर कारखान्याच्या निवडणुकांचे बिगूल वाजले असून, दिवाळीनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अहमदनगर जिल्ह्यातील तीन साखर कारखाना (Sugar Factories) निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील अशोक आणि श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी व श्रीगोंदा साखर कारखान्याच्या निवडणुकांचे बिगूल वाजले असून, दिवाळीनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार असून, त्यांनीच तिन्ही साखर कारखान्यांच्या प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्याचदिवशी आलेल्या हरकती निकाली काढल्या जाणार असून, २६ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
मुरकुटे, जगताप, नागवडेंची प्रतिष्ठा
अशोक सहकारी साखर कारखाना सूत्रधार माजी आमदार भाानुदास मुरकुटे यांच्या ताब्यात आहे. तर श्रीगोंदा येथील सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना राजेंद्र नागवडे यांच्या ताब्यात आहे. कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना माजी आमदार राहुल जगताप यांच्या ताब्यात आहे. या तिघांच्याही पुन्हा एकदा सत्त्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांनी राजेंद्र नागवडे विरोधात बंड पुकारत सवता सुभा मांडला आहे.
ससाणे, शेलारांच्या भूमिकेकडे लक्ष
भानुदास मुरकुटे यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माजी आमदार जयंतराव ससाणे यांच्या निधनानंतर प्रथमच अशोकची निवडणूक होत आहे. ससाणे यांचे चिरंजीव करण हे पॅनल करतात की मुरकुटेशी जुळवून घेतात, याकडे श्रीरामपूरकरांच्या नजरा लागले आहे. तर कुकडीच्या जगतापांना नेहमीच विरोध करणारे घनशाम शेलार हेही आता राष्ट्रवादीत आहेत. शिवाय शेलार यांना राज्य साखर महासंघाचे संचालकपद मिळावे, यासाठी जगताप यांच्या कुकडीनेच ठराव करून पाठविला होता. त्यामुळे मुरकुटे, जगताप दोघांनाही सत्तेसाठी फारसा संघर्ष करावा लागणार नाही, असे चित्र दिसते आहे.