राजकारणात चमत्कार होऊ शकतो; विखे-पाटील यांचे सूचक विधान

काँग्रेस पक्षामध्ये नेत्यांचे अवमूल्यन होत आहे, तरीदेखील सत्तेसाठी लाचार झालेले टिकून राहतात. त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

    अहमदनगर : सत्तेसाठी महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) मोट बांधली असून, त्यात वैचारिक भूमिका नाही. भाजप-सेनेची पारंपरिक युती आहे. ते एकत्र येत असतील तर स्वागतच केले पाहिजे. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. कुणीही कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो, असं सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. त्यामुळे भाजप-सेने युतीच्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंबादेतील एका कार्यक्रमात ‘भावी सहकारी’ असा विरोधकांचा उल्लेख केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी युतीचे संकेत दिले होते. त्यात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान हे त्यांचं व्यक्तिगत मत होतं. पण राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणाचा मित्रंही नसतो. त्यामुळे काही चमत्कार होऊ शकतो, असे ते म्हणाले.

    काँग्रेसने मुंगेरीलालची स्वप्न पाहू नये

    भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्याकडे विखे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, काँग्रेस पक्षामध्ये नेत्यांचे अवमूल्यन होत आहे, तरीदेखील सत्तेसाठी लाचार झालेले टिकून राहतात. त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. पक्षाचं हित पाहण्यापेक्षा व्यक्तिगत हित पाहण्याकडे काँग्रेसच्या मंत्र्यांचे लक्ष आहे. काँग्रेसने आता मुंगेरीलालची स्वप्न पाहू नयेत, असा चिमटाही त्यांनी काढला.