गटविकास अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने बूट घेऊन धावणाऱ्या नाहाटा यांना अटक

  श्रीगोंदा : ग्रामपंचायत दप्तर तपासणी क्षुल्लक कारणावरून गटविकास अधिकाऱ्यांच्या दिशेने बूट घेऊन धावणारे श्रीगोंद्यातील नेते बाळासाहेब नाहाटा यांना पोलिसांनी अटक केली. लोणीव्यंकनाथ ग्रामपंचायतीची तपासणी का केली, अशी विचारणा करत सरपंच अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवू नये. या कारणावरून आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी थेट पंचायत समितीमध्ये आले. तेथे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

  तसेच नाहाटा यांनी संतापाच्या भरात हातात बूट घेऊन काळे यांच्या अंगावर धावून गेले. काळे यांच्या शासकीय गाडीवर बूट मारत त्यांना गाडीतून खाली ओढत धक्काबुक्की केली. गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नाहाटा यांच्याविरोधात फिर्याद दिली असून, त्या फिर्यादीवरून नाहाटा यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्यासह शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळासाहेब नाहाटा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

  दुपारी नाहाटा हे पंचायत समितीमध्ये आले. त्यांनी त्यांच्याकडील अर्ज काळे यांच्याकडे दिला. काळे यांनी त्यावर शेरा मारून तो अर्ज पुढील कारवाईसाठी संबंधित विभागाकडे दिला. त्यावेळी नाहाटा यांनी काळे यांना तालुक्यात सरपंच अपात्रतेच्या किती कारवाया केल्या याची विचारणा करत एकेरी भाषा वापरली. ‘तू इतर नेत्यांच्या हातचे बाहुले बनून काम करतोस, तू लोणी ग्रामपंचायतीची तपासणी का केली, असे म्हणत सरपंच अपात्रतेचा प्रस्ताव पाठवणार आहेस का?, अशी विचारणा केली.

  नाहाटा यांनी काळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पायातील बूट काढून नाहाटा काळे यांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी नाहाटा यांना आवरले. त्यानंतर काळे आपल्या शासकीय गाडीत जाऊन बसले असता नाहाटा यांनी शासकीय गाडीवर बूट मारत काळे यांना गाडीबाहेर ओढत ‘तू पंचायत समितीमध्ये कसे काम करतो, असे म्हणत परत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काळे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन नाहाटांवर गुन्हा दाखल केला आहे.

  पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच शिवीगाळ

  तक्रार देण्यासाठी प्रशांत काळे हे पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये बसलेले असताना नाहाटा पुन्हा त्याठिकाणी आले व तेथे येऊन त्यांनी तहसीलदार व काही पत्रकारांसमोर पुन्हा गटविकास अधिकारी काळे यांना शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. पोलीस निरीक्षक ढिकले मात्र त्यावेळी तिथे उपस्थित नव्हते. परंतु पंचायत समितीत एवढा गोंधळ झाल्यानंतर सुद्धा नाहाटा यांनी थेट पोलीस निरीक्षकांच्याच केबिनमध्ये गटविकास अधिकाऱ्यांना पुन्हा शिवीगाळ केली.