बाळ बोठेला दिलासा नाहीच; जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

पोलिस तपासात नाव समोर आले असल्याची माहिती बोठेला समजताच तो फरार झाला होता. त्याला 102 दिवसांनंतर हैद्राबाद येथील बिलालनगर परिसरातून अटक करण्यात आली.

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : रेखा जरे (Rekha Jare) हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ ज. बोठे (Bal Bothe) याचा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. बोठेच्या जामीन अर्जावर बुधवारी दुपारी सुनावणी झाली. बोठेने जामीनासाठी 14 जुलै रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

    यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. 30 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली होती. जरे यांच्या हत्येनंतर पोलिसांनी मारेकर्‍यांसह पाच जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींनी जरे यांच्या हत्येची सुपारी पत्रकार बाळ ज. बोठे याने दिली असल्याचे सांगितले.

    पोलिस तपासात नाव समोर आले असल्याची माहिती बोठेला समजताच तो फरार झाला होता. त्याला 102 दिवसांनंतर हैद्राबाद येथील बिलालनगर परिसरातून अटक करण्यात आली. या प्रकरणाचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेले आहे. बोठेने नाजूक प्रकरणातून जरे यांची हत्या केली, असे दाखल दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

    बाळ बोठे सध्या न्यायालयीन कोठडीत

    जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठे सध्या न्यायालयीन कोठडीत पारनेर येथे आहे. आरोपी पक्षातर्फे अ‍ॅड. महेश तवले आणि सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकार वकिल अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी युक्तिवाद केला. युक्तिवादावेळी अ‍ॅड. यादव पाटील यांना अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी सहाय्य केले. युक्तिवादानंतर न्यायालयाने आज बोठेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.