आता इंग्रजीतही होणार हरिनामाचा गजर

    शिर्डी : वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आधार घेऊन भक्तीचा गजर हरी कीर्तनाच्या माध्यमातून बोलीभाषेमध्ये होतो हे सर्वश्रुत आहे. परंतु, आपण हेच कीर्तन इंग्रजीमध्ये कधी ऐकले आहे का? नाही ना…मग आता यापुढे ते इंग्रजीत ऐकायला मिळणार आहे. बाभळेश्वर येथील सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुलमध्ये इंग्रजीतील कीर्तनाचे ४०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

    बाभळेश्वर येथील सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुलमध्ये इंग्रजीतील कीर्तनाचे देखील प्रशिक्षण दिलं जातं. इयत्ता तिसरी ते पदवीधर, पदव्युत्तर असे ४०० विद्यार्थी या संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. अध्यात्म ,कला, विज्ञान याची सांगड घालत कालानुरूप पुढचे पाऊल टाकत अद्ययावत आध्यात्मिक सत्संग, हार्मोनियम मृदंग वादन, योगाभ्यास, व्यक्तिमत्त्व विकास याच्या प्रशिक्षणासोबतच आपला विद्यार्थी अध्यात्माचा वारसा पुढे नेऊन इतर राज्यांत तसेच परदेशांतही त्याचे महत्त्व सांगू शकला पाहिजे.

    हा उद्देश ठेवून सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुलचे संस्थापक ह. भ. प. नवनाथ महाराज म्हस्के व ह.भ.प. भगवान महाराज डमाळे यांनी कीर्तन संस्कारातील मूळ नियमांच्या अधीन राहून शालेय शिक्षणाबरोबरच इंग्रजी भाषेतील कीर्तन शिकविले. हेच विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या देशाची संस्कृती संस्कार याचा लौकिक परदेशी देखील पसरवतील यात शंका नाही.