महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नगर जिल्ह्यात मोठी संधी : बाळा नांदगावकर

आपल्या भाषणात नांदगावकर यांनी जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. जिल्ह्यात मनसे कार्यकर्ते जीवाचे रान करतात पण आपण मागे पडतो कारण आपल्या पदाधिकाऱ्यांचे हातात हात नाहीत, कुणीही परस्पर निर्णय घेतो.

  अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा मेळावा रविवारी नगरमध्ये पार पडला. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. नजीकच्या काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकां साठी जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असा आदेश नांदगावकर यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिला.

  भाषणात नांदगावकर यांनी नगर मेळाव्यास दिसलेला प्रतिसाद पाहून जिल्ह्यात पक्षाला मोठा ‘स्कोप’ असून कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास यश निश्चित मिळेल, असा आशावाद दिला. जुन्यांना सोबत ठेवून आणि नव्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवा, महिला, युवती यांना पक्षात सामावून घ्या, समाजातील सर्व गरजू घटकाला मदत करा, अन्याय-अत्याचाराला विरोध करत लढा द्या, असे ते म्हणाले. कोणताही पक्ष संघर्ष केल्याशिवाय उभा राहत नाही, आंदोलन हा पक्षाचा आत्मा असतो तर सामान्य कार्यकर्ता ही पक्षाची शक्ती असते असे त्यांनी सांगितले.

  मेळाव्यास जिल्हा जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, देविदास खेडकर, बाळासाहेब शिंदे, दत्ता कोते, जिल्हा सचिव नितीन भुतारे, गणेश रंधावणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

  पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

  आपल्या भाषणात नांदगावकर यांनी जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. जिल्ह्यात मनसे कार्यकर्ते जीवाचे रान करतात पण आपण मागे पडतो कारण आपल्या पदाधिकाऱ्यांचे हातात हात नाहीत, कुणीही परस्पर निर्णय घेतो. यापुढे असे चालणार नाही पदाधिकारी बदलाचे अधिकार हे फक्त पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे आहेत. तुमच्यात जमत नाही याचा फटका बसत आहे, खुर्च्या अडवून ठेवून काम करणारे आता नकोत, काम करणारे हवेत असे सदेतोडपणे नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.

  ईडापीडा टळो, मनसेचे राज्य येवो

  नांदगावकर कालच नगर मुक्कामी आले होते आज सकाळी त्यांनी शनिशिंगणापूर इथे शनिमूर्तीला अभिषेक केला. इडापीडा टळो आणि महाराष्ट्रात मनसेचे राज्य येवो असे साकडे त्यांनी शनिदेवांना घातले. त्याचबरोबर सेनेचे मंत्री शंकरराव गडाख तसेच भाजप खासदार सुजय विखे यांची भेट घेतली.