पुढील जीवनाची वाटचाल आनंदीमय होण्यासाठी प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवा : न्यायाधीश तापकीरे

नेवासा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढील जीवनाची वाटचाल आनंदीमय होण्यासाठी प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवा त्यासाठी लोक अदालत हे मुख्य व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन नेवासा न्यायालयाचे अतिरीक्त व सत्र जिल्हा न्यायाधीश एस. एम. तापकीरे यांनी यावेळी बोलताना केले.

    नेवासा : नेवासा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढील जीवनाची वाटचाल आनंदीमय होण्यासाठी प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवा त्यासाठी लोक अदालत हे मुख्य व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन नेवासा न्यायालयाचे अतिरीक्त व सत्र जिल्हा न्यायाधीश एस. एम. तापकीरे यांनी यावेळी बोलताना केले.

    नेवासा तालुका विधी सेवा समिती,नेवासा वकील संघ,जिल्हा प्रॅक्टिशनर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एम तापकीरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून राष्ट्रीय लोकअदालतचा शुभारंभ करण्यात आला.

    यावेळी जिल्हा व अतिरिक्त न्यायाधीश जी.बी.जाधव, चौधरी, न्यायाधीश एस डी सोनी, न्यायाधीश ए.बी. निवारे, न्यायाधीश ए.ए.पाचारणे, बीडीओ शेलार, नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अँड. बन्सीभाऊ सातपुते,जिल्हा प्रॅक्टिशनर संघाचे अध्यक्ष अँड.अण्णासाहेब अंबाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

    यावेळी बोलताना न्यायाधीश एस एम तापकीरे म्हणाले की, प्रलंबित वाद निकाली काढण्यासाठी लोक अदालत हे सर्वसामान्य माणसांसाठी हक्काचे व्यासपीठ असून लोक अदालतच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करा,न्यायासाठी भांडावे पण ती भांडणे टोकापर्यंत जाऊ देऊ नये तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

    यावेळी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये पंचायत समितीच्या वतीने घरकुलाच्या प्रश्नांच्या संदर्भात एकूण १७०० प्रकरणे ठेवण्यात आली होती.तर यावेळी झालेल्या लोक अदालतसाठी आठ पॅनलवर पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश व दोन पंचाची नियुक्ती करण्यात आली होती.

    राष्ट्रीय लोकअदालतच्या निमित्ताने न्यायालयाच्या प्रांगणात मंडप उभारण्यात आला होता एकूण ११४ ग्रामपंचायतीच्या मार्फत प्रलंबित घरकुलाच्या प्रलंबित प्रकरणे यावेळी तडजोडी करून त्यातील काही प्रकरणे निकाली काढण्यात आली. दिवाणी व फौजदारी दावे वीज वितरण कंपनीच्या केसेस, बँक व पतसंस्था यांची प्रकरणे ही या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवण्यात आली होती.