देवळाली पालिकेचा दिल्लीत गौरव; केंद्रीयमंत्र्यांच्या हस्ते ‘थ्री स्टार’ मानांकन

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव २०२१ मध्ये सर्वेक्षणात देवळाली प्रवरा पालिकेला 'बेस्ट सेल्फ सस्टनेबल सिटी' पुरस्कार तसेच कचरा मुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.

    राहुरी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव २०२१ मध्ये सर्वेक्षणात देवळाली प्रवरा पालिकेला ‘बेस्ट सेल्फ सस्टनेबल सिटी’ पुरस्कार तसेच कचरा मुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. पालिकेला दिल्लीत गौरविण्यात आले. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिल्लीत केंद्रीयमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

    दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंग पुरी, राज्यमंत्री कौशल कुमार, छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग, अंदमान निकोबारचे उपराज्यपाल, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुगार्शंकर मिश्रा यांच्या हस्ते हा पुस्कार देण्यात आला. देवळाली प्रवरा शहरास देशभर राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशात बेस्ट सेल्फ-सस्टनेबल सिटी पुरस्कार, राज्यात दुसरी रँक, देशाच्या पश्चिम विभागात चौथी रँक व कचरा मुक्त शहरामध्ये थ्री स्टार सिटी मानांकन असे पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली.

    स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात दुसरी रँक

    देवळाली प्रवरा शहरास स्वच्छ अमृत महोत्सव (सर्वेक्षण ) २०२१ मध्ये देवळाली प्रवरा शहरास देशातील २५ ते ५० हजार लोकसंख्येच्या सर्व शहरामध्ये बेस्ट सेल्फ सस्टनेबल सिटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये दुसरी रँक मिळाली तर देशाच्या पश्चिम विभागात चौथी रँक मिळाली आहे. कचरा मुक्त शहरामध्ये थ्री स्टार सिटी मानांकनाचा पुरस्कार मिळाला, स्वच्छ सर्वेक्षण २०२१ बेस्ट सेल्फ-सस्टनेबल सिटी पुरस्कार व कचरा मुक्त शहर थ्री स्टार मानांकनाचा पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुगार्शंकर मिश्रा व भारत मिशनच्या सहसचिव रूपा मिश्रा हस्ते वितरित करण्यात आला.