खासगी हॉस्पिटलनी ऑक्सिजन प्रकल्प उभारावे; जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांचे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्देश

ॲक्सिजन या प्रकल्पासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तताही होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मरची व्यवस्था करण्यात येत आहे. या प्रकल्पांच्या परिसरात पन्नास अतिरिक्त बेडसची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी शेडसची उभारणी सुरु आहे.

  अहमदनगर: संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात आहे. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि अतिरिक्त पन्नास बेड व्यवस्था उभारणीचे काम सुरु आहे. हे काम गतीने पूर्ण करण्याच्या निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भाेसले यांनी दिले. त्याचबरोबर, खासगी रुग्णालयांनीही त्यांच्या क्षमतेप्रमाणे अशा ऑक्सिजन प्रकल्प उभारणी करावी अथवा द्रवरुप ऑक्सिजन साठवणूक टाक्यांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
  कोरोना उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भाेसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, पल्लवी निर्मळ, रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे जिल्हा मुख्यालय तर तालुका स्तरावरील महसूल, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

  जिल्ह्यातच करणार ऑक्सिजन निर्मिती

  पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कमी कालावधीत रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या लाटेत हा वेग अधिक असण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन पायाभूत आरोग्य सेवा बळकटीकरणाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेवेळी आपल्याला ऑक्सिजन तुटवडा जाणवला. तिसऱ्या लाटेत तो जाणवू नये. जिल्ह्यासाठी आवश्यक ऑक्सिजन जिल्ह्यातच निर्माण व्हावा, यासाठी आपण ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी प्रत्येक ग्रामीण रुग्णालय परिसरात करीत आहोत. या संदर्भात आवश्यक कार्यवाही सर्व यंत्रणांनी सुरु केली असली तरी अधिक गतीने काम करुन तो प्रकल्प लवकरात लवकर उभारणी होईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

  सार्वजनिक ठिकाणी पुन्हा गर्दी
  सध्या ब्रेक दी चेन अंतर्गत जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. अशा ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भाेसले यांनी दिले. नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात व ग्रामीण भागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. काही नागरिक विनामास्क फिरतानाही दिसत आहेत. कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

  ॲक्सिजन या प्रकल्पासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तताही होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मरची व्यवस्था करण्यात येत आहे. या प्रकल्पांच्या परिसरात पन्नास अतिरिक्त बेडसची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी शेडसची उभारणी सुरु आहे. हे कामही तातडीने व्हायला हवे.
  -डाॅ. राजेंद्र भाेसले, जिल्हाधिकारी