भाजपमध्ये गेलेल्यांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाचे संरक्षण; जयंत पाटलांचा आरोप

भाजपमध्ये गेलेल्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत. मात्र, अशांना इन्कमटॅक्स, ईडी, सीबीआयचे सरंक्षण असल्याचा आरोप करत पाटील यांनी आम्ही चौकशांना घाबरत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

    अहमदनगर : महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर ओढून-ताणून ईडी, सीबीआयचा (CBI) वापर करून गुन्हे दाखल करून सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू असून, ज्यांनी खरे आर्थिक घोटाळे करून भाजपत प्रवेश केला आहे ते भाजपच्या आशीर्वादाने शाबूत असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. तसेच भाजपमध्ये गेलेल्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत. मात्र, अशांना इन्कमटॅक्स (Income Tax Department), ईडी, सीबीआयचे सरंक्षण असल्याचा आरोपही त्यांनी केला.

    राष्ट्रवादी पक्षाच्या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने अहमदनगर पाटील आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, खडसे, त्यांचे जावई व हसन मुश्रीफ आदींवर होत असलेल्या चौकशा या राजकीय प्रेरित आहेत. आमच्याकडेही भाजपत गेलेले आणि ज्यांची ईडी चौकशी व्हावी, अशा नोटिशी निघालेल्या होत्या, अशांची यादी आम्ही देणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

    चौकशांना घाबरत नाही

    भाजपमध्ये गेलेल्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत. मात्र, अशांना इन्कमटॅक्स, ईडी, सीबीआयचे सरंक्षण असल्याचा आरोप करत पाटील यांनी आम्ही चौकशांना घाबरत नसल्याचे त्यांनी नमूद केले.