पावसाची दांडी, पाथर्डीकर हवालदिल, दुबार पेरणीचे संकट

    पाथर्डी : जून महिन्याची २१ तारीख गेली तरी पावसाचा थांगपत्ता लागत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या थोड्या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. येत्या आठवड्यात पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट येऊ शकते, असे शेतकरीवर्गाकडून बोलले जात आहे.

    पाथर्डी तालुका हा खरीपाचा तालुका म्हणून ओळखला जातो. बाजरी हे मुख्य पिक म्हणून ओळखले जात असले तरी अलीकडील काही वर्षात नगदी पिक म्हणून ओळखले जाणारे कापूस याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्याचा काही भागात पाऊस झाला. त्या पावसावर काही भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, वीस दिवस झाले, तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जून महिन्यात पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण केली आहे.

    तसेच उसने पैसे घेऊन खाते व बियाणे खरेदी केली आहेत. पाऊस कधी येईल, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मागील वर्षी झालेला जादा पावसामुळे पिके म्हणावी तशी आली नाहीत. त्यात कोरोनाचे संकट त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही राहिले नाही. चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाला. तर शेतकरी जगू शकेल, अशी परिस्थिती आहे. आज रोजीला शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. येत्या आठ दिवसांत पाऊस आला नाही तर ज्या भागात पेरणी झाली आहे. त्या भागात दुबार पेरणी करावी लागेल असे चित्र सध्याचे आहे.