शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून उत्पन्न वाढीसाठी संशोधन करणे गरजेचे : कृषीमंत्री भुसे

  राहुरी : राज्यातील ७५ टक्के कुटुंब हे शेतात आणि शेतीशी निगडीत कार्य करतात. राज्यातील ५० टक्क्यांवर रोजगार निर्मिती ही शेतीत होते. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार शेतकरी हा अन्नदेवता आहे. कृषि विद्यापीठ, कृषि विभाग आणि शेतकरी हे एक कुटुंब आहे. आपण सर्वांनी शेतकऱ्यांचे कष्ट कसे कमी करता येतील, त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी संशोधन आणि कार्य करणे गरजेचे असल्याचे राज्याचे कृषि मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

  महात्मा फुले कृषि विद्यापीठात आज आढावा बैठकीला प्रमुख मार्गदर्शन करताना भुसे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संचालक संशोधन व विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, कृषि विभागाचे संचालक विकास पाटील उपस्थित होते.

  दादा भुसे म्हणाले, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकऱ्यांसाठी कार्य फार मोठे आहे. पण यापुढे नाविण्यपूर्ण संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ वाचवणारे, कमी खर्चाचे आणि शेतकऱ्यांना शेतीवर वापरता येईल, असे सूक्ष्म सिंचन पध्दती विकसित होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे विद्यापीठाच्या बियाण्यावर विश्वास असून, त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यापीठांनी जास्तीत जास्त मूलभूत बियाण्याचे उत्पादन वाढवावे. उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादनाला चालना द्यावी. कमी दरात उच्च प्रतिचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे.

  मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पिकाच्या उत्पादकतेबरोबर पोषकता कशी वाढेल. यावर संशोधनात भर द्यावे. नाविन्यपूर्ण संशोधन करण्याऱ्या शेतकऱ्यांशी कृषि विद्यापीठ आणि कृषि विभागाने समन्वय ठेवावा. आता शेतकरी बाजारपेठेच्या मागणीनुसार नवीन पिकांची मागणी करत आहे, यासाठी परदेशी भाजीपाला व फळ यावर कृषि विद्यापीठांनी आपले संशोधन करावे. बाहेरच्या देशातून काही वाण आणण्याची गरज असली तर त्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात येईल.

  मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विकेल ते पिकेल या सदराखाली बाजारपेठेच्या मागणीनुसार वाण विकसित करणे, परदेशी पिकांचा संशोधनात आंतरभाव करणे व त्याचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या बियाण्यांना आणि रोपांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने बिजोत्पादन आणि रोपनिर्मिती कृषि विद्यापीठांना स्वयंपूर्ण बनू, असे मत मंत्री भुसे यांनी व्यक्त केले.

  विद्यापीठांनी विकसित केलेले विविध पिकांच्या वाणांनी शेतकऱ्यांना समृध्द केले आहे. डाळिंबाचे फुले भगवा वाण, ऊसाचा फुले २६५ वाण इत्यादी यामुळे संशोधनाला चालना देण्यासाठी यावर्षीपासून उत्तम प्रतिचे कृषि संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
  …..
  कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले, कृषि मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार कृषि विद्यापीठामध्ये विविध संशोधन, शिक्षण व विस्तार कार्य प्रगतीपथावर सुरु आहे. विद्यापीठाच्या संशोधनाला गती देण्यासाठी बंद झालेला विद्यापीठ आकस्मीक निधी पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. याचबरोबर विद्यापीठ मॉडेल अॅक्ट अमलात आणला तर कृषि विद्यापीठांना सहाय्य होईल. कृषि विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण आणि विस्ताराला अधिक चालना देण्यासाठी विद्यापीठातील ५० टक्के जागा रिक्त असलेल्या जागा भरण्यास शासन स्तरावर परवानगी मिळावी. तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत संशोधनाला गती मिळण्यासाठी १० टक्के निधी मिळावा.

  कृषिमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार विद्यापीठाने संशोधन विस्तार आणि शिक्षणात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालक संशोधन डॉ. शरद गडाख यांनी सादर केला. यावेळी कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांचे हस्ते कोविड-आपत्तीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा ६५ लाख चार हजारचा धनादेश कृषिमंत्र्यांना सुपूर्त करण्यात आला.

  यावेळी मंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील विविध फळपिकांचे प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

  आढावा बैठकीस कृषि विभागाचे संचालक फलोत्पादन कैलास मोते, रफिक नायकवाडी, सुधाकर बोराळे, विद्यापीठाचे सर्व सहयोगी अधिष्ठाता व विभाग प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पंडित खर्डे यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. महानंद माने यांनी मानले.