शंभर टक्के लसीकरण करणाऱ्या गावाला बक्षीस; नगरमध्ये उपक्रम

अहमदनगर जिल्ह्यामध्ये सहा लाख नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. जिल्हा प्रशासनाने या नागरिकांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित केले असून शंभर टक्के गाव लसीकरण करणाऱ्या गावास जिल्हा पातळीवर बक्षीस दिले जाणार आहे.

    नगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अहमदनगर जिल्ह्यामध्ये सहा लाख नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. जिल्हा प्रशासनाने या नागरिकांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित केले असून शंभर टक्के गाव लसीकरण करणाऱ्या गावास जिल्हा पातळीवर बक्षीस दिले जाणार आहे.

    लग्न समारंभ, बाजार, प्रवासी वाहतूक गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी यांची सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, ग्रामसुरक्षा दल, व्यापारी संघटना, पोलीस आणि नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

    महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर यावेळी उपस्थित होते. गर्दीच्या ठिकाणी आणि बाजारात कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरणाचे कॅम्प आयोजित केले जाणार आहे. लस घ्यावी यासाठी जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यातील सहा लाख नागरिक नागरिकांना दुसरा डोस घेणे बाकी आहे. तालुकास्तरावर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठक घेऊन या नागरिकांना लसीकरणाचे आदेश तालुका प्रशासनाला दिले आहेत. लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रवेशबंदी केली जाणार आहे. प्रसंगी शासकीय योजनांचे लाभ बंद करण्याचा निर्णयही घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.