संचारबंदीचे उल्लंघन; सहा परप्रांतीयासह १२ जण ताब्यात

अहमदनगर : करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी नाकेबंदीवर १२ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सहा परप्रांतीय नागरिकांचा समावेश आहे.

 अहमदनगर : करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी नाकेबंदीवर १२ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सहा परप्रांतीय नागरिकांचा समावेश आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील निमगाव खलू येथे श्रीगोंदा पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आलेली असते. या ठिकाणी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. यावेळी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शेतीमालाची वाहतूक करणारी एक गाडी पुण्यावरून कुळधरणच्या (ता.कर्जत) दिशेने चालली होती. परंतु, या गाडीचा संशय आल्याने पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीत अशोक बाळासाहेब शिंदे, सोमनाथ अशोक देशमुख, शुभांगी सोमनाथ देशमुख (रा.कोपर्डी, ता.कर्जत), पोपट बंकट सुपेकर, उत्तम दत्तात्रय कळसकर, दीपक बंकट सुपेकर (रा.कुळधरण, ता.कर्जत) हे पुण्याहून गाडीत लपून आल्याचे आढळले. पोलिसांनी (एम. एच.–१६, सीसी ५७४८) नंबरचा पिकअप ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– सहा जणांना घेतले ताब्यात
त्याचबरोबर, गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पारगाव फाटा येथे श्रीगोंदा पोलिसांनी तीन मोटारसायकलवर राजस्थानकडे निघालेल्या सहा जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संजय काळे यांच्या फिर्यादीवरून लंगमराम कुमावत, जठाराम कुमावत, मुनराम कुमावत, अंबाराम कुमावत, कमलराम कुमावत, हेमाराम कुमावत (रा. जि. बाडनेर, राजस्थान) या सहा जणांविरुद्ध संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन दुचाकी ताब्यात घेतल्या.