शिर्डी संस्थानची कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी आमदार अशुतोष काळे

१७ विश्वस्त मंडळाचे सदस्य नियुक्त करावयाचे असून, त्यातील ११ जणांची नियुक्ती करण्यात आली असून, शिर्डी नगरपंचायतीचे अध्यक्ष पदसिध्द सदस्य आहे.

  अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाची घोषणा शासनाने केली असून, अध्यक्षपदी जिल्ह्यातील कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार अशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ‍ॅड. जगदिश हरिश्चंद्र सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. १७ विश्वस्त असलेल्या संस्थानमध्ये शासनाने १२ विश्वस्तांची नियुक्ती करताना पाच जागा रिक्त ठेवल्या आहेत.

  महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईचे सिध्दीविनायक देवस्थान अध्यक्षपद शिवसेनेकडे असून, पंढरपूर, शिर्डी देवस्थान अध्यक्ष पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती. पंढरपूर काँग्रेसला तर शिर्डी संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचा निर्णय झाल्यानंतर शासनाने बारा विश्स्तांची नावे राजपत्रात प्रसिध्द केली आहेत. अध्यक्षपदाची संधी मिळालेले आमदार अशुतोष काळे हे कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे. आता शिर्डी संस्थानच्या अध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपविण्यात आली आहे.

  अशी असेल कार्यकारिणी…

  आमदार अशुतोष काळे-अध्यक्ष, जगदिश हरिश्चंद्र सावंत-उपाध्यक्ष, विश्वस्त-अनुराधा आदिक, सचिन गुजर, अविनाश दंडवते, अ‍ॅड. सुहास आहेर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, एकनाथ गोंदकर, राहुल कणाल, जयंत जाधव, शिवाजी गोंदकर.

  गोंदकर आणि वाबळे यांना दुसऱ्यांदा संधी

  नियुक्त केलेल्या विश्वस्तांमध्ये एकनाथ गोंदकर आणि सुरेश वाबळे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. नव्या विश्वस्त मंडळात जिल्ह्यातील ९ जणांचा समावेश आहे. अध्यक्ष अशुतोष काळे हे कोपरगावचे तर अनुराधा आदिक या श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा असून अ‍ॅड. सुहास आहेर हे संगमनेर वकिल संघटनेचे अध्यक्ष आहेत. अविनाश दंडवते हे राहातामधील असून सुरेश वाबळे राहुरीचे, सचिन गुजर श्रीरामपूर तर एकनाथ गोंदकर, महेंद्र शेळके, शिवाजी गोंदकर हे स्थानिक शिर्डीचे आहेत. राहुल कणाल मुंबईचे तर जयंत जाधव हे नाशिकचे माजी आमदार आहेत.

  आणखी एकूण सहा विश्वस्त बाकी 

  १७ विश्वस्त मंडळाचे सदस्य नियुक्त करावयाचे असून, त्यातील ११ जणांची नियुक्ती करण्यात आली असून, शिर्डी नगरपंचायतीचे अध्यक्ष पदसिध्द सदस्य आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा तर शिवसेनेचे पाच सदस्य नव्या मंडळात असणार आहेत. नियुक्त केलेल्यांमध्ये पाच राष्ट्रवादीचे चार काँग्रेसचे तर शिवसेनेचे दोन आहेत. काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे एक, शिवसेनेचे तीन विश्वस्त करणे बाकी आहे. त्यात कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून आहे.