घारगावच्या जळीतग्रस्त शिंदे कुटुंबाला मदतीचा ‘आधार’!

-मदतीचे साहित्य पाहून कुटुंबियांचे डोळे पाणावले

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील प्रभाकर शिंदे यांच्या घरात चार दिवसांपूर्वी झालेल्या शाॅर्टसर्कीटमुळे घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यातच पै-पै करून  शोकेसमध्ये साठवलेले पैसेही या आगीतून सुटले नाही. या धक्क्याने शिंदे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले होते. दरम्यान, गोरगरीब कुटुंबाला व अनाथ मुलांना कायमच मायेचा ‘आधार’ देणाऱ्या संगमनेर येथील आधार फाऊंडेशने नुकतेच जळीतग्रस्त शिंदे कुटुंबाला मदतीचा ‘आधार दिला असून हे सर्व साहित्य पाहून कुटुंबियांचे डोळे पाणावले होते.

चार दिवसांपूर्वी घरात शाॅर्टसर्कीट होवून संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, पैसे, टिव्ही आदी जळून खाक झाले होते. त्यामुळे शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले होते. याबाबत माध्यमांनी मदतीसाठी दानशूरांना आवाहन केले होते. याची दखल संगमनेर येथील ‘आधार’ फाऊंडेशनच्या सदस्यांनी घेत नेहमीप्रमाणे मदतीचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी (ता.३०) सायंकाळी फाऊंडेशनचे समन्वयक डाॅ. महादेव अरगडे, स्वामी समर्थ फर्निचरचे मालक वाल्मिक चौधरी, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके, सोमनाथ मदने, सुखदेव इल्हे, संतोष टावरे, सुनंदा भागवत, कवीता टावरे, ज्ञानराज बाजारचे मालक धनंजय आहेर, लक्ष्मण कोते, नारायण भागवत, इस्माईल मुजावर आदींनी घारगाव येथे येवून शिंदे कुटुंबाला ही मदत सुपूर्द केली आहे.

याप्रसंगी सुखदेव इल्हे, सोमनाथ मदने यांनी आधार फाऊंडेशनचे कार्य समजावून सांगताना म्हणाले, अनाथ मुलांसाठी आधार फाऊंडेशन वर्षांनुवर्षांपासून काम करत आहे. अनेक अनाथ मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. गरिबीतून वर आलेली मुले उच्च पदावर जात आहे. आजपर्यंत १६५ मुलांना ‘आधार’ देण्याचे काम केले आहे. सुनंदा भागवत म्हणाल्या, आधार फाऊंडेशनचे काम खरोखर कौतुकास्पद आहे. तळागाळातील गरीब कुटुंबाला आज आधार  देण्याचे काम केले आहे. डाॅ. महादेव अरगडे म्हणाले, आधार फाऊंडेशन नेहमीच गोरगरीब कुटुंबांना मदत करत आहे. यावेळी वाल्मिक चौधरी, किशोर डोके, संतोष टावरे यांनीही आधार फाऊंडेशनचे कार्य विशद केले.