चोरीच्या उद्देशानेच राहात्यातील दुहेरी हत्याकांड ; तिघे अटकेत, दोघे पसार

  राहाता : राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील पती-पत्नीच्या दुहेरी हत्याकांतीलआरोपींचा छडा लावत पोलीसांनी तिघांना अटक केली. दोघे पसार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. चोरीकरण्याच्या उद्देशानेच हत्याकांड झाल्याचे ते म्हणाले.

  बेंद्र्या उर्फ दुधकाल्या उर्फ भारत भोसले (वय २८रा.पढेगांव), दिलीप विकास भोसले (वय १९ रा.जवळके) आणि आवेल विकास भोसले (वय २० रा.जवळके) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मायकल चव्हाण व डोंगऱ्या चव्हाण ( दोघेही, रा.लक्ष्मीनगर, कोपरगांव) अशी फरार असलेल्या आरोपींची नावे आहेत.२५ जूनच्या रात्री राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील शेतकरी शशिकांत श्रीधर चांगले (वय ६० ) व त्यांची पत्नी सिंधूबाई शशिकांत चांगले (वय ५०) यांच्या डोक्यात फावडे मारुन निघृण हत्या झाली होती. प्रारंभी शेतीच्या वादातून किंवा भावकीतून हे हत्याकांड झाले असावे असा संशय पोलीसांना होता. त्या अनुशंगाने पोलीसांनी मयताच्या कुटूंबीयांची चौकशी करुन एका मुलासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले होते.मात्र नंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी तपासाची दिशा बदलून बेंद्र्या उर्फ दुधकाल्या उर्फ भारत भोसले यास ताब्यात घेतले. त्याच्या माहिती आधारे इतर आरोपींना अटक केली.

  या पत्रकार परिषदेस श्रीरामपूर विभागाच्या अतिरीक्त पोलीस अधिक्षक दिपाली काळे, शिर्डी विभागाचे पोलीस उपअधिक्षक संजय सातव, गुन्हा अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये उपस्थित होते.

  हे प्रश्न अनुत्तरीत!
  पोलीसांनी आरोपींना कोणत्या ठिकाणी अटक केली. त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत केला की नाही तसेच पोलीसांना या आरोपी विषयी गुप्त माहिती होती तर मयताचा मुलगा व त्याच्या दोन साथीदरांना अगोदर ताब्यात का घेतले होते? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

  अटकेतील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली
  असून मारहाण करणे व चोरीच्या उद्देशाने आरोपींनी चांगले दांपत्यांची निघृण हत्या केली असल्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगीतले.