
नगर-पुणे मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सुपे येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून १०० अॅम्पिअर क्षमतेच्या ८ बॅटरी चोरीला गेल्या आहेत. चोरीला गेलेल्या बॅटरीची किंमत ३२ हजार रुपये आहे.
पारनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगर-पुणे मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सुपे येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून (State Bank ATM) १०० अॅम्पिअर क्षमतेच्या ८ बॅटरी चोरीला गेल्या आहेत. चोरीला गेलेल्या बॅटरीची किंमत ३२ हजार रुपये आहे. यासंदर्भात स्टेट बँकेच्या सुपे शाखेचे व्यवस्थापक मनीष भादविय यांनी सुपे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुपे पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या कंपनी संचलीत पेट्रोल पंपावर स्टेट बँकेचे एटीएम (State Bank ATM) आहे. नगर-पुणे रस्त्यावर सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या पेट्रोल पंपावरील एटीएममधून बॅटऱ्यांची चोरी झाल्याने सुपे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे गुन्हेगारी वाढल्याने सुपे परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात आले. त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठपुरावा केला. स्वतंत्र पोलीस ठाणे झाल्याने गुन्हेगारीला आळा बसेल, असा विश्वास हजारे यांनी व्यक्त केला होता. मात्र, सुपे पोलीस ठाण्याच्या आजवरच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्याऐवजी गुन्हेगारांशी हातमिळवणी केली असल्याचे चित्र आहे.
गॅस, स्पिरीट, डांबर, स्टीलच्या तस्करीला सुपे पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत असल्याने सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारा नगर-पुणे महामार्ग अमली पदार्थांसह विविध वस्तूंच्या तस्करीचे केंद्र बनला असल्याची चर्चा सुपे परिसरात आहे.
धाडसी चोऱ्या, भरदिवसा होणारी दुचाक्यांची चोरी, खून अशा घटना वारंवार घडत असतानाही गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने सुपे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुपे पोलीस ठाण्याच्या कारभारात लक्ष घालावे व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुपे परिसरातील नागरिकांनी केली.