यावर्षी गीता जयंतीचा उत्सव होणार ऑनलाईन : डॉ.संजय मालपाणी

सत्तर देशातील पन्नास हजार गीतापाठक सामुहिकपणे करणार एक लाख अध्यायांचे आवर्तन

संगमनेर : बाल संस्कार क्षेत्रात कार्यरत असलेल्या गीता परिवाराद्वारे श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रचार व प्रसारासाठी वैश्‍विक पातळीवर कार्य सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून दरवर्षी गीता जयंतीचा महोत्सव व्यापक स्वरुपात साजरा करण्याची परंपरा आहे. यावर्षी या उत्सवावर कोविडचे सावट असले तरीही ‘ऑनलाईन’ पद्धतीने गीता जयंती साजरी केली जाणार असून त्यात सत्तर देशातील पन्नासह हजारांहून अधिक गीताप्रेमी सहभाग घेणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान गीता परिवाराचे संस्थापक स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज व पतंजली योगपीठाचे आचार्य बालकृष्णजी यांचे विचार ऐकण्याची संधीही गीताप्रेमींना मिळणार असल्याची माहिती गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.

दरवर्षी डिसेंबर महिन्यात येणार्‍या मोक्षदा एकदशीच्या दिनी गीता जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. यावर्षी श्रीमद्भगवद्गीतेचा ५१५७ वा प्राकट्य दिवस आहे. त्या निमित्ताने शुक्रवार २५ डिसेंबररोजी सायंकाळी सात ते आठ या वेळेत गीता परिवाराद्वारा ऑनलाईन पद्धतीने गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी जगभरातील सत्तर देशांतील पन्नास हजारांहून अधिक गीताप्रेमी भगवद्गीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे सामुहिक पठण करणार आहेत. गीता परिवाराचे संस्थापक व श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज व पतंजली योगपीठाचे आचार्य बालकृष्ण या महोत्सवात गीताप्रेमींना मार्गदर्शनही करणार आहेत.

या उत्सवादरम्यान गीतेतील विविध प्रसंगानुरुप मनमोहक नृत्य सादर केले जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने साजर्‍या होणार्‍या या महोत्सवात सहभागी होणार्‍या सर्व गीताप्रेमींना गीता परिवाराकडून ‘ई प्रशस्तीपत्र’ दिले जाईल. भगवद्गीता ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल भेट आहे. हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर व्यक्तिच्या सम्यक विकासाचे मार्गदर्शन देणारा हा अद्भुत ग्रंथ आहे. भगवद्गीतेच्या प्रचार व प्रसारासाठी गीता परिवाराद्वारा गेल्या साडेतिन दशकांपासून विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षीही लॉकडाऊनच्या सात महिन्यांच्या कालावधीत जगभरातील सत्तर देशांतील ५२ हजार गीता अभ्यासकांना शुद्ध उच्चारासह गीता पठनाचे धडे दिले गेले. या उपक्रमात देश व विदेशातील साडे आठशे कार्यकर्त्यांनी १० भाषांमध्ये समर्पित सेवा दिल्याने या उपक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.

यावर्षी जगावर कोविडचे सावट आहे. त्यामुळे गीता परिवाराने यावर्षीच्या गीता जयंतीचा उत्सव ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्याची तयारी पूर्ण केली आहे. येत्या शुक्रवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते ८ या कालावधीत गीता परिवाराच्या यू-ट्युब चॅनेलवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे. गीताप्रेमींनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन गीता परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.