श्रीरामपुरात शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : खेळता-खेळता मुले तलावाजवळ गेली आणि पाण्यात बुडाली. शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन भावंडांसह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथे आज सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

    दुसरी व चौथीत शिकणाऱ्या दोन भावांसह एकाचा मृत्यू झाला. दत्ता अनिल माळी (वय ८), चैतन्य अनिल माळी (वय १०) आणि चैतन्य शाम बर्डे (वय ८) अशी मृत मुलांची नावे आहेत. कान्हेगावातील अतुल बाळासाहेब खरात यांच्या शेततळ्यात रविवारी नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. सोमवारी शाळेत चाललो असे सांगून तिघे घराबाहेर पडले. पण हे तिघेही शाळेत न जाता पाणी खेळण्यासाठी शेततळ्यात उतरले.

    पोहता येत नसल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोलीस पथकाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. पंचनामा केल्यानंतर तिघांवर शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.