मागोवा २०२०चा : संगमनेरचा लक्षवेधी पॅटर्न!

जागतिक महामारीचे वर्ष २०२० हे कायम लक्षात राहणार असून या संकटात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘एक तालुका एक परिवार’ या संकल्पनेतून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून कोरोना संकट, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीसह सामाजिक, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक विभागात केलेल्या कामाचा ‘संगमनेर पॅटर्न २०२०’ हा राज्यभर लक्षवेधी ठरला आहे.

राजू नरवडे, संगमनेर : जागतिक महामारीचे वर्ष २०२० हे कायम लक्षात राहणार असून या संकटात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘एक तालुका एक परिवार’ या संकल्पनेतून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून कोरोना संकट, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीसह सामाजिक, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक विभागात केलेल्या कामाचा ‘संगमनेर पॅटर्न २०२०’ हा राज्यभर लक्षवेधी ठरला आहे.

वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे राज्याच्या राजकारणात मोठे स्थान आहे. यामुळे सर्व तालुका आनंदमयी राहिला. १ जानेवारी ते १७ जानेवारी याकाळात सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेने क्रीडाप्रेमींना मोठी मेजवानी दिली. तर अमृतवाहिनीतील मेधा महोत्सव हा राज्यातील सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू ठरला. मेधामधील ‘संवाद तरुणाईशी’मध्ये नामदार आदित्य ठाकरे, नामदार आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, आमदार धीरज देशमुख, आमदार झिशान सिद्दीकी, आमदार ऋतुराज पाटील यांनी तरुणांशी मनमोकळा संवाद साधला. हा चर्चेचा राज्यभर विषय ठरला तर सांस्कृतिक कार्यक्रमात भाऊ कदम, कुशल बद्रीके, संस्कृती बालगुडे, अवधुत गुप्ते यांनी धमाल उडवून दिली. जयंती महोत्सव यशोधन मैदानावर अवधूत गुप्तेने गायलेले ‘ये बंदा लई जोरात बाळासाहेब थोरात’ या गीतावर आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांसह हजारो उपस्थितांनी ठेका धरला.

याकाळात रणजीतसिंह देशमुख यांची महानंदच्या अध्यक्षपदी निवड होवून संगमनेरच्या सहकाराचा आणखी गौरव झाला. मार्चनंतर आलेल्या कोरोना संकटात जगाबरोबर संगमनेरही थांबले. गर्दीने फुललेले रस्ते शांत झाले. पायी चालणार्‍या मजुरांसाठी अमृत उद्योग समूह, युवक काँग्रेस, एनएसयूआय यांनी अन्नछत्र सुरु केले. यामध्ये विविध सेवाभावी संस्था सहभागी झाल्या. कोरोनाची मोठी जनजागृती झाली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दररोज ऑनलाईन आढावा बैठक घेवून संगमनेर तालुक्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले. तालुक्यात सर्वात जास्त तपासण्या झाल्या. ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान यशस्वीपणे राबविले. तसेच घुलेवाडी येथील रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जासाठी मंजुरी दिली. तसेच स्वतंत्र महिला हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावला.

कोरोना पाठोपाठ आलेले चक्रीवादळ, अतिवृष्टीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत नामदार थोरात यांनी राज्याचा दौरा केला. यावर्षी पाऊस चांगला झाला. भंडारदरा, निळवंडे, आढाळा धरण भरले. नद्या, ओढे, बंधारे वाहू लागले. तळेगाव भागातही चांगला पाऊस झाला. अगदी टोकाचे देवकौठे येथील सर्व बंधारे तुडुंब भरले आणि शेतकरी सुखी झाला. दिवाळीत अमृत उद्योग समूहाने बाजारात सुमारे १०० कोटी आणल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होवून बाजारपेठा पुन्हा फुलल्या. कोरोनामुळे सर्व शाळा, कॉलेज बंद असूनही अमृतवाहिनी कॉलेजने ऑनलाईनचा आदर्श पॅटर्न राबवून गुणवत्तेबरोबर लौकिकही जपला. अमृतवाहिनीच्या ४१६ विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड झाली.

तर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचा सन २०२०-२०२१ या गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वामसी चाँदरेड्डी, आशिष दुआ, बी.एम.संदीप, आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत झाला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने मालपाणी लॉन्स येथे झालेल्या ऑनलाईन शेतकरी बचाव या महाव्हर्च्युअल रॅलीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वामसी चाँदरेड्डी, आशिष दुआ, बी.एम.संदीप, सोनल पाटील, आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी संबोधले.

नगरपालिकेने स्वच्छतेत पुन्हा देशपातळीवर बक्षीस मिळविले. हायटेक बसस्थानक सर्वांसाठी लक्षवेधी ठरले तर नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांना जीवन गौरव पुरस्कारही मिळाला. कोरोना संकटातही निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्यासाठी नामदार थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला. अकोले तालुक्यात वेगाने काम सुरू ठेवले. सहकारातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ वर्पे व संदीप खताळ यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली. विविध क्षेत्रात संकटात लढणारा संगमनेर पॅटर्न मात्र २०२० मध्ये यशस्वी ठरला.