जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी शेळके तर व्हाईस चेअरमनपदी काशिनाथ नरोडे

अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विलास शेळके (अकोले) यांची तर व्हाईस चेअरमनपदी काशिनाथ नरोडे (पारनेर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या सभागृहात तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.५) सायंकाळी ही निवडीची प्रक्रिया पार पडली.

    नगर : अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विलास शेळके (अकोले) (Vilas Shelke) यांची तर व्हाईस चेअरमनपदी काशिनाथ नरोडे (पारनेर) (Kashinath Narode) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या सभागृहात तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.५) सायंकाळी ही निवडीची प्रक्रिया पार पडली.

    अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी झाली. या निवडणुकीत संजय कडूस यांच्या नेतृत्वाखालील जय श्री. गणेश पॅनलने सर्व २१ जागा जिंकत मोठा विजय मिळविला होता. या सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा तालुका उपनिबंधक के. आर.रत्नाळे यांनी बुधवारी (दि.५) सायंकाळी संस्थेच्या सभागृहात आयोजित केली होती.

    या सभेत चेअरमन पदासाठी विलास शेळके (अकोले) यांच्या नावाची सूचना अरुण जोर्वेकर यांनी मांडली. त्यास कल्याण मुटकुळे यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमनपदी काशिनाथ नरोडे (पारनेर) यांच्या नावाची सुचना राजू दिघे यांनी मांडली. त्यास ज्योती पवार यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवाराचे नाव आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाळे यांनी दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यावेळी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.