अमरिश भाईंचा ‘बिनविरोध’ विजय!; महाविकास आघाडीच्या गौरव वाणींसह चौघांची माघार

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे अमरिशभाई पटेल तर महाविकास आघाडीने   गौरव वाणी यांना उमेदवारी दिली होती.त्याचबरोबर नंदुरबारमधून दिघे नामक नगरसेवकाने अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती.

    धुळे, राज्यभरात महाविकास आघाडी आणि भाजपामधील तडजोडीच्या राजकारणातुन विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध जाहीर झाल्या आहेत. धुळ्यातुन भाजपाचे हेवीवेट उमेदवार अमरिशभाईंचा बिनविरोध विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांच्यासह चौघा उमेदवारांनी दुपारी पक्ष आदेशानुसार उमेदवारी मागे घेतली आहे. भाईंच्या बिनविरोध विजयाचे वृत्त कळताच त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.

    विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे अमरिशभाई पटेल तर महाविकास आघाडीने   गौरव वाणी यांना उमेदवारी दिली होती.त्याचबरोबर नंदुरबारमधून दिघे नामक नगरसेवकाने अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, भाजपाचे भुपेश पटेल यांनी डमी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शाम सनेर आणि भुपेशभाई यांची माघार आज निश्‍चित होती. मात्र राज्यस्तरावर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. तडजोडीच्या  राजकारणातुन बिनविरोध निवडीचा फॉर्म्यूला महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये ठरला. त्यानुसार ज्या-ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे प्राबल्य आहे,जेथून ज्यांचा उमेदवार निवडीची शक्यता आहे.तेथून दुसर्‍या पक्षाच्या उमेदवाराने माघार घ्यावी असे ठरले.

    त्यानुसार कोल्हापूरमध्ये काँग्रेसला भाजपाने झुकते माप दिले. भाजपा उमेदवाराने माघार घेतल्याने  काँग्रेसचा विजय झाला. त्याचीच परतफेड धुळ्यात झाली. धुळ्यात भाजपाचे प्राबल्य असल्याने भाईंचा विजय जवळपास निश्‍चित मानला जात होता.त्यामुळे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरुन उमेदवार गौरव वाणी यांनी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणुक शाखेत जावून उमेदवारी मागे घेतली.