आर्यन खान प्रकरण : सुनील पाटलांचे धुळ्यातील घर ‘लॉक’

धुळ्यात सुनील पाटीलचे येणे-जाणे कमीच होते. केव्हा तरी तो धुळे शहरातच माहेर असलेल्या पत्नीसह मुलगी, आई- वडीलांना भेटण्यासाठी येत होता. त्याच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले. ते सरळमार्गी होते. तेली समाजात विवाह जुळवणे व शेतीत त्यांना रस होता. त्यांना मुलगा सुनीलची वर्तणूक पसंत नव्हती. त्यामुळे ते नेहमी मुलास रागवायचे व कष्टाने जीवन जगण्याचा सल्ला देत.

  धुळे : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी अर्थात आर्यन खानप्रकरणी पैसे उकळण्याच्या घटनेशी नाव जोडले गेलेल्या धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरात वैभवनगरमध्ये संजय चौधरी-पाटील याचा बंगला आहे. पाच दिवसांपासून त्याचे नाव चर्चेत आल्यानंतर त्याचा येथील बंगला कुलूप बंद आहे. घराच्या दारात वीज बिले पडून असून शनिवारी मात्र रांगोळी काढलेली दिसून आली. कायम मुंबई, दिल्ली, गुजरातमध्ये ठिकठिकाणी जा-ये करणाऱ्या सुनील पाटीलमुळे धुळे जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे.

  सर्वसामान्य कुटुंबातील आणि कुणीही गॉडफादर नसलेला सुनील चौधरी-पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील गृहमंत्री असताना शहरासह जिल्ह्यात चर्चेत आला. त्याचे आर. आर. पाटील यांच्याशी घनिष्ठ संबंध होते असे उघड बोलले जायचे. त्यावेळी त्याने येथे दहिहंडीचा जंगी कार्यक्रम केला होता. तसेच गणेशोत्सवासाठीही निधी दिला होता.

  पैसे उडवण्याची सवय
  सुनील पाटील यास डान्स बार आणि पैसे उडविण्याची सवय हाेती. त्याचा मुंबईत अधिकतर ठिय्या होता. मुंबई-दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरील सरकारी अधिकारी व राजकीय मंडळींशी त्याने चांगले संबंध प्रस्थापित केले. धुळ्यातील अनेकांना तो मुंबईतील डान्स बारमध्ये घेऊन जायचा. त्यांचे बिलही सुनील पाटील भरायचा. हाती आलेला पैसा लागलीच उडविण्यात त्याला रस होता. अशा स्थितीमुळे त्याच्या हाती पैसा फारसा रहायचा नाही. त्यामुळे तो कर्जबाजारीही झाला. त्यामुळे गैरमार्गाकडे अधिक खेचला गेला. यानंतर त्याचे नाव थेट आर्यन खान पार्टी प्रकरणी पैसे उकळण्याच्या घटनेत समोर आल्याने धुळे जिल्ह्याकडे केंद्रीय व राज्य तपास यंत्रणेचे लक्ष वेधले गेले आहे. सुनील पाटील याच्या धुळ्यातील संबंधातील व्यक्तींचीही चौकशी सुरू झाली असून त्याच्यासोबत मुंबईत राहणाऱ्या धुळ्यातील व्यक्तीही रडारवर असल्याची माहिती पुढे येत आहे.

  धुळ्यात सुनील पाटीलचे येणे-जाणे कमीच होते. केव्हा तरी तो धुळे शहरातच माहेर असलेल्या पत्नीसह मुलगी, आई- वडीलांना भेटण्यासाठी येत होता. त्याच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले. ते सरळमार्गी होते. तेली समाजात विवाह जुळवणे व शेतीत त्यांना रस होता. त्यांना मुलगा सुनीलची वर्तणूक पसंत नव्हती. त्यामुळे ते नेहमी मुलास रागवायचे व कष्टाने जीवन जगण्याचा सल्ला देत. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी कथित संबंधांमुळे त्याचा मंत्रालयातही सहज वावर होता. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्या, निविदा, कंत्राट मिळवून देण्याचे उद्योग तो करतो. एखादा विषय किंवा व्यक्तीचे पाळेमुळे शोधणे, यात त्याचा हातखंडा असून त्यातून वरकमाई करायची आणि पैसे शौकपाण्यात उडवायचे ही त्याची कार्यशैली आहे. अशातून गैरउद्योगातील व्यक्ती आणि गैरमार्गाकडे सुनील पाटील ओढला गेला आणि थेट आता हाय प्रोफाईल ड्रग्ज पार्टी आणि त्यात पैसे उकळण्याच्या प्रकरणात तो गोवला गेला आहे.

  शिरढाण्याचा रहिवासी
  सुनील चौधरी-पाटील हा धुळे शहरापासून दहा किलोमीटरवरील शिरढाणे (जापी- शिरढाणे, ता. धुळे) येथील रहिवासी असून त्याची वडिलोपार्जीत शेती आहे. वडिलांच्या निधनानंतर त्याचा भाऊ शेती करतो. पूर्वजांना मिळालेल्या ‘पाटीलकी’मुळे तो पाटील आडनाव लावतो. सतत फिरस्तीवर व त्याचे अधूनमधून धुळ्यात येणे-जाणे होत असले तरी त्याचा नेमका ठावठिकाणा कुणालाही सांगता येत नाही.