‘औरंगाबादचे नामांतरण करणारच’ मंत्री सुभाष देसाईंचं इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर

शासन निर्णयात करण्यात आलेल्या संभाजीनगरच्या उल्लेखावरुन राजकारण तापलं आहे. जलील यांनी अशा प्रकारच्या शासन आदेशावर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. कोणतीही निवडणूक आली की असे धंदे सुरु होतात. आता लोक पाणी द्या म्हणतील तेव्हा हे नाव बदलणार. हिंमत असेल तर त्यांनी नाव बदलावं. असा टोला जलील यांनी शिवसेनेला लगावला होता.

    धुळे : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वाद रंगला आहे. गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत निमंत्रित सदस्य नेमण्याच्या शासन निर्णयातील रामचंद्र भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर या उल्लेखावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला होता. इतकंच नाही तर हिंमत असेल तर त्यांनी नाव बदलाचा सरळ निर्णय घ्यावा. पण पडद्याआडून अशा खेळ्या करु नयेत, असे आव्हान जलील यांनी दिले होते. त्यावर आता शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, असे प्रत्युत्तर दिले.

    शिवसेना अशी आव्हानं गेल्या 55 वर्षापासून स्वीकारत आहे. शिवसेना आजकालची नाही. जलील यांनी त्यांचा पक्ष महाराष्ट्रात कधी आला ते पाहावं. शिवसेनेचा उगम 1966 पासून झाला आहे. तेव्हापासून असे आरोप-प्रत्यारोप, आव्हान, टोले अशा सगळ्यांना भुईसपाट करुन भगवा फडकावला आहे. तसंच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, असं प्रत्युत्तर सुभाष देसाई यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलंय.

    दरम्यान, शासन निर्णयात करण्यात आलेल्या संभाजीनगरच्या उल्लेखावरुन राजकारण तापलं आहे. जलील यांनी अशा प्रकारच्या शासन आदेशावर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. कोणतीही निवडणूक आली की असे धंदे सुरु होतात. आता लोक पाणी द्या म्हणतील तेव्हा हे नाव बदलणार. हिंमत असेल तर त्यांनी नाव बदलावं. खरेतर असं करणाऱ्या कक्ष अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी निलंबित करायला हवं. पण हे सगळे निवडणुकीपूर्वी असेच वागणार, असा टोला जलील यांनी शिवसेनेला लगावला होता.