शहरात शांतता, पोटात कालवाकालव, जगण्यासाठी गरीबांची धडपड, काट्याकुट्या जमवण्यासाठी राबतंय वार्धक्य

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध असल्याने शहरात ठिकठिकाणी शुकशुकाट असताना झाशी राणी पुतळा चौकात हृदयाला धस्स करणारा प्रसंग दिसला. एरवी ये-जा करणाऱ्‍यांकडून भिक्षा मागून आयुष्याची गुजराण करणारी एक आजी भरदुपारच्या रणरणत्या उन्हात रस्त्यावरून सरपण घसरत आणताना दिसली.

  धुळे : कोरोनाच्या महाभयानक संकटामुळे लादलेल्या निर्बंधांमुळे शहरातील रस्ते, चौक, गल्ल्या ओस पडलेल्या… एखाद-दुसरा रस्त्यावर फिरताना दिसलाच तर बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांकडून विचारपूस… अशा या जीव वाचविण्यासाठी चाललेल्या धडपडीत आयुष्याच्या मावळतीकडे निघालेला एक जीव मात्र त्याच शुकशुकाट असलेल्या रस्त्यांवरची शांतता फरपटत जाणाऱ्या सरपणाच्या मोळीने भंग पावतेय… हा आवाज आणि ते दृश्‍य बंदोबस्तासाठी तैनात होमगार्डलाही मायेचा पाझर फोडते अन् त्याच्या खिशातून आपसूक काही पैसे त्या सुरकुत्या पडलेल्या हातात पडतात… जगण्याची ही धडपड शहरात रोजच कुठेना कुठे फिरत असेल… पण कोरोनाच्या भयाण शांततेत ही धडपड आज प्रकर्षाने नजरेस पडली.

  कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध असल्याने शहरात ठिकठिकाणी शुकशुकाट असताना झाशी राणी पुतळा चौकात हृदयाला धस्स करणारा प्रसंग दिसला. एरवी ये-जा करणाऱ्‍यांकडून भिक्षा मागून आयुष्याची गुजराण करणारी एक आजी भरदुपारच्या रणरणत्या उन्हात रस्त्यावरून सरपण घसरत आणताना दिसली.

  फिकीर फक्‍त जगण्याची

  गॅस सिलिंडर नावालाच, वाढत्या महागाईत भरडलेल्या या आजीला जगण्यासाठी सरपणाचाच आधार. म्हणून ती घराबाहेर पडली असावी. सरपण आणून टीचभर पोटासाठी भाकरीची सोय करण्यासाठी संचारबंदीसारख्या स्थितीतही तिला कोणतीही पर्वा नव्हती. फिकीर होती ती फक्त रोजच्या जगण्याची. झाशी राणी पुतळा चौकापर्यंत सरपण घसरत आणताना वयोमानाने कंबरेतून वाकलेली ती आजी पुरती थकली होती. स्वत:च्या साडीचा ‘पदर’ मास्क म्हणून तोंडाला लावत ती आजी पुन्हा सरपणाची ती मोळी घसरत आपल्या घराकडे निघाली. कितीही मोठी संकटे येवोत, शेवटच्या श्‍वासापर्यंत लढायचे, जगायचे… असा संदेशच जणू ती आजी देऊन गेली.

  होमगार्डकडून आर्थिक मदत

  संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर तिथे बंदोबस्तासाठी तैनात एका होमगार्डपुढे तिने हात पसरला. त्या आजीच्या जगण्याच्या धडपडीला सलाम म्हणून म्हणा किंवा आजीची किव आली नाही म्हणून म्हणा त्यांनी खिशातून वीस रुपयांची नोट काढून आजीच्या हातात दिली. वीस रुपयांच्या या मदतीनेही आजीच्या थकलेल्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली.