: जिल्हादंडाधिकारी संजय यादव धुळे : आगामी सण, उत्सव तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात 28 मे ते 11 जून 2020 या कालावधीत मुंबई

.: जिल्हादंडाधिकारी संजय यादव

धुळे : आगामी सण, उत्सव तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात २८ मे ते ११ जून २०२० या कालावधीत मुंबई पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी तथा  जिल्हाधिकारी संजय यादव यांनी लागू केले आहेत.

            जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी, पोलिस अधीक्षक, धुळे यांनी सादर केलेला अहवाल पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी त्यांना मुंबई पोलिस अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेवून फिरणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे आणि बरोबर नेणे, सार्वजनिक शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे, हावभाव करणे अथवा सोंग आणणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

            सभा घेण्यास, मिरवणूक काढण्यास, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या परवानगीशिवाय काढण्यात आलेले मोर्चे, रॅली, सभा. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७  (१) (३) हा आदेश ज्यांना लाठी अगर तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा अपंग व्यक्तींना लागू नाही. तसेच शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाहीत.

तसेच मुंबई पोलिस अधिनियमानुसार संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या पूर्वपरवानगी शिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही मंडळीस (जमावास) किंवा मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चा, मीटिंग, कार्यक्रम, रॅली इत्यादीबाबत स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत योग्य तो निर्णय घेवून परवानगी द्यावी. अशी परवानगी तसेच लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, आठवडेबाजार अगर प्रेतयात्रेच्या जमावास हे निर्बंध लागू होणार नाहीत, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे. हा आदेश २८ मे २०२० रोजीचे ००.०१ वाजेपासून ते ११ जून २०२० रोजीच्या २३.५५ वाजेपर्यंत लागू होईल.