केंद्र सरकार ड्रग्जसंदर्भातील कायद्यामध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत; रामदास आठवले यांचा खुलासा

पत्रकारांशी संवाद साधत असतांना ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे. यावेळी बोलत असतांना आठवलेंनी ड्रग्स घेणाऱ्याच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचा खुलासा देखील केला आहे.

    धुळे : पत्रकारांशी संवाद साधत असतांना ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे. यावेळी बोलत असतांना आठवलेंनी ड्रग्स घेणाऱ्याच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचा खुलासा देखील केला आहे.

    रामदास आठवले नेमकं काय म्हणाले? 

    आठवले म्हणाले की,’आमच्या मंत्रालयाचं म्हणणं आहे की, दारु पिणाऱ्याला, सिगारेट पिणाऱ्याला, बिडी पिणाऱ्याला आपण तुरुंगात टाकत नाही. ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगामध्ये न टाकता नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी नशामुक्ती केंद्र उपयुक्त आहे. म्हणून सध्या जो कायदा आहे ज्यात ड्रग्ज घेतलेल्याला तुरुंगात टाकलं जातं त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा विचार आमचं मंत्रालय करत आहे. लवकरच त्यासंबंधीचा कायदा जर झाला तर ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात न पाठवात नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात येईल,’ असेही ते म्हणाले.

    दोंडाईचा वरवाडे नगर परिषद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पणसाठी आठवले आज धुळे दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना अमलीपदार्थांसंदर्भातील कायदा बदलण्याचा विचार सुरु असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.