fine

गाडी ओव्हरलोड असल्याचे सांगत तुला दंड भरावा लागेल, असे ट्रकचालक चौरे यांना अधिकाऱ्‍यांनी सांगितले. गाडीचा वजनकाटा केला असून, गाडी ओव्हरलोड नसल्याचे ट्रकचालक चौरे यांनी संबधित अधिकारी व कर्मचाऱ्‍यांना सांगितले व दंड भरण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चौरे यांच्या कानशिलात लगावली

    जळगाव : ट्रक ओव्हरलोड असल्याच्या कारणावरुन आरटीओच्या विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी अग्रवाल चौकात महामार्गावर ट्रक अडविला. ट्रक चालकाने वजनकाटा केला असून ट्रक ओव्हरलोड नसल्याचे सांगत दंड भरण्यास नकार दिला असता, ट्रक चालकास आरटीओच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ट्रकचालकाच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात अधिकार्‍यासह कर्मचारी अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

    पहाटे अडवला ट्रक
    छत्तीसगढ राज्यातील रहिवासी चालक विनोद मुकूंदलाल चौरे (३७) हे त्यांच्या ताब्यातील मालाने भरलेला ट्रक घेवून जळगावहून जात होते. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास (एम.एच. ०४ के.आर. ६४१९) या शासकीय वाहनातून आलेल्या आरटीओ विभागाच्या अधिकार्‍यांसह दोन कर्मचारी अशा तिघांनी चौरे यांचा ट्रक महामार्गावर जळगाव शहरात अग्रवाल चौकात ऍक्सेस ब्रेन हॉस्पिटलच्या समोर अडविला.

    लाकडी दांडक्याने मारहाण
    गाडी ओव्हरलोड असल्याचे सांगत तुला दंड भरावा लागेल, असे ट्रकचालक चौरे यांना अधिकाऱ्‍यांनी सांगितले. गाडीचा वजनकाटा केला असून, गाडी ओव्हरलोड नसल्याचे ट्रकचालक चौरे यांनी संबधित अधिकारी व कर्मचाऱ्‍यांना सांगितले व दंड भरण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चौरे यांच्या कानशिलात लगावली. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण मारहाण केली.

    पोलिसांत गुन्हा दाखल
    या मारहाणीत चालक चौरे यांच्या पायाचे हाड मोडले असून दुखापत झाली आहे. जखमी चालक विनोद चौरे यांनी दिलेल्या जबाबावरुन सोमवार, २२ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी (एमएच ०४ केआर ६४१९) या आरटीओ विभागाच्या वाहनावरील अधिकारी तसेच कर्मचारी (नाव गाव माहित नाही) अशा तीन जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक विजय शिंदे हे करीत आहेत.