chagan bhujbal

ओबीसी परिषदेमध्ये(OBC Conference) राज्यातील ओबीसी नेत्यांनी जाहीर आणि आक्रमक भूमिका मांडल्या. मात्र, त्याविषयी बोलताना आपल्या भाषणात छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी मिश्किलपणे टीका करत लोकांची दाद मिळवली.

  जळगाव : केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आपल्या विरोधातील लोकांना गप्प केलं जात असल्याची टीका सातत्याने भाजपावर केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज जळगावमध्ये(Jalgaon) ओबीसी परिषदेत(OBC Conference) बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी भाजपला टोला लगावला.

  ओबीसी परिषदेमध्ये राज्यातील ओबीसी नेत्यांनी जाहीर आणि आक्रमक भूमिका मांडल्या. मात्र, त्याविषयी बोलताना आपल्या भाषणात छगन भुजबळ यांनी मिश्किलपणे टीका करत लोकांची दाद मिळवली.

  “इथे सगळे जण अनेक मुद्द्यांवर जोरजोरात बोलले. चर्चा केली. पण सावध राहा बाबा. उद्या इन्कम टॅक्स घरी नाही आला म्हणजे झालं. जो जो या कामात येईल, त्याला बरोबर उस चरख्यात टाकून रस काढला जातो, तसं काढायचं काम असतं हे. आता सध्या खडसे साहेबांच्या पाठिमागे ते लागले आहेत”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

  “हे सगळं असं होत असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आपण जेव्हा एखादी भूमिका मांडतो, तेव्हा सावध राहा सगळे. जे घाबरले असतील, त्यांनी ताबडतोब भाजपामध्ये जायचं. मग तुम्हाला सगळं माफ. खरं तेच सांगतोय”, असं भुजबळ म्हणाले.

  “आत्ताच हे गुलाबराव पाटील बोलले. मंत्रिमंडळात देखील ते माझ्या पाठिशी ओबीसीच्या मुद्द्यावर बोलतात, त्याबद्दल त्यांचे आभार. ओबीसी मंत्री देखील खूप आहेत. मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही. पण बोलणारे फार थोडे आहेत”, असा टोला भुजबळांनी यावेळी लगावला.

  यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी तुरुंगात घालवलेल्या दिवसांची देखील आठवण सांगितली.

  “कपिल पाटील यांनी माझा जीव वाचवला. जेलमध्ये जेव्हा मला टाकलं तेव्हा एकदा फार गंभीर प्रकृती झाली होती. तिथे सोपी गोष्ट असते. कुणालातरी जेलमध्ये टाकायचं. तो आजारी पडला की त्याच्याकडे बघायचं नाही आणि एक दिवस गेल्यावर म्हणायचं की हार्ट अटॅकने गेला. संपला विषय. पण जेव्हा कळलं की भुजबळ एकदम सीरियस आहेत, तेव्हा हे कपिल पाटील विधानमंडळात उभे राहिले. म्हणाले, तुम्ही काय वागणूक देत आहात त्यांना. हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत, नीट काळजी घेत नाहीत. तिथे मारून टाकणार की काय तुम्ही? नंतर शरद पवारांनी पत्रच पाठवलं, की भुजबळांना काही झालं, तर हे सरकार जबाबदार राहील. सुदैवाने मी बाहेर आलो”, असं भुजबळ म्हणाले.

  “दगडूशेठ गणपतीला आमच्या हजारो भगिनी अथर्वशीर्ष म्हणतात. त्या जागेपासून अगदी जवळच सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी सुरू केलेली पहिली शाळा आहे. पण तिथे एकही महिला गेली नाही. एकाही माझ्या भगिनीला वाटलं नाही की तिथे जाऊन डोकं टेकावं. त्यांनी शिकवलं म्हणून तुम्ही अथर्वशीर्ष वाचू शकलात. प्रचंड अंधश्रद्धा आणि ती धर्माच्या अफूची गोळी आज सगळ्यांवर राज्य करतेय”, असं भुजबळ म्हणाले.