eknath khadse

    जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढला. एक रुपयाचा जरी आपण गैरव्यवहार केल्याचे कोणी सिद्ध करून दाखवले तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे प्रतिआव्हान खडसेंनी विरोधकांना दिले(Jalgaon District Bank scam: Prove allegations, retire from politics; Eknath Khadse’s counter-challenge).

    विरोधकांकडून सध्या जे काही सुरू आहे तर फक्त आपली छळवणूक करण्यासाठी सुरू आहे, आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नसल्याने तुम्ही ईडी लावा अथवा काय लावायचे ते लावा आपले थेट आव्हान आहे, असे खडसे म्हणाले. आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नसल्याने कोणाला काय चौकशा करायच्या त्या करू द्या. मागील काळात बँकेचे केलेले काम पाहता सहकार पॅनलला पुन्हा निवडून देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    सहा वर्षांपूर्वी जिल्हा बँक अवसायनात जाण्याच्या मार्गावर होती, मात्र रोहिणी खडसे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर अतिशय काटकसरीचे आणि नियोजनपूर्वक धोरण राबविल्याने जिल्हा बँक चांगले काम करणाऱ्या देशातील पहिल्या दहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. विरोधकांनी बँकेच्या कारभार विषयी शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र एक रुपयाचा देखील गैरव्यवहार जिल्हा बँकेत झालेला नाही. अशा शंका उपस्थित करणाऱ्यांसाठी आपले आव्हान आहे, त्यांनी जिल्हा बँकेत झालेला गैरव्यवहार समोर आणून दाखवावा. आपण राजकारणातून संन्यास घेऊ, केवळ आपली छळवणूक करण्यासाठी विरोधक वेगवेगळे प्रयोग करीत असल्याचा आरोेप खडसेंनी केला.