जळगाव शहरात सलून व्यावसायिकाची हत्या, शहरात भितीचे वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, आजारी असल्याने काही दिवसांपासून सुनील टेमकर यांचं दुकान बंद होतं म्हणून त्यांनी रविवारी दुकान उघडले. रात्री १० वाजता त्याच्या दुकानाजवळ छोटा माया आला होता. त्याने सुनीलकडे दारू पिण्यासाठी पैसे तसेच एक ब्लेड मागितले. त्यावर टेमकर यांनी नकार दिला असता, नकार दिल्याचा राग आल्याने मायाने चॉपरने सुनीलच्या डाव्या बरगडीच्या वर छातीवर एक वार केला. त्यानंतर टेमकर यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

    जळगाव – शहरात एका ३६ वर्षीय सलून व्यावसायिकाचा क्षुल्लक कारणावरून निर्घृण खून झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ममुराबाद रस्त्यावरील प्रजापत नगराचे रहिवासी असलेले सुनील टेमकर (वय ३६) हे जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान चालवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. रविवारी ते दुकान गेले असता त्यांची हत्या करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, आजारी असल्याने काही दिवसांपासून सुनील टेमकर यांचं दुकान बंद होतं म्हणून त्यांनी रविवारी दुकान उघडले. रात्री १० वाजता त्याच्या दुकानाजवळ छोटा माया आला होता. त्याने सुनीलकडे दारू पिण्यासाठी पैसे तसेच एक ब्लेड मागितले. त्यावर टेमकर यांनी नकार दिला असता, नकार दिल्याचा राग आल्याने मायाने चॉपरने सुनीलच्या डाव्या बरगडीच्या वर छातीवर एक वार केला.

    त्यानंतर टेमकर यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी तसेच अप्पर पोलीस अधीक्षकांनी जिल्हा रुग्णालय गाठले.

    या घटनेमुळे शनिपेठ, चौघुले प्लॉट परिसरात तणाव निर्माण झाला. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी पाहणी करून संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना शनिपेठ पोलिसांना केल्या आहेत. मृत सुनील याच्या पश्चात आई, पत्नी योगिता, मुलगा रोनक, मुलगी दीप्ती, लहान भाऊ असा परिवार आहे. सुनीलच्या खुनानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मायाला पोलिसांनी मध्यरात्री साडेबारा वाजता ताब्यात घेतले.