girish mahajan

जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादात दाखल गुन्ह्यावरून हे छापे टाकण्यात आल्याचं कळतंय. सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. नंतर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे

    पुणे: जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेशी निगडीत पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे पोलीसांच्या विशेष पथकाने जळगाव व पुण्यात एकाचवेळी पाच प्रमुख आरोपींच्या घर व कार्यालयावर छापेमारी केली आहे. येथून महत्वाची कागदपत्रे हाती लागली असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. ४० जणांच्या पथकाने ही छापेमारी केली आहे. तत्पुर्वी या गुन्ह्यात भाजप आमदरांचे नाव आहे. पुणे पोलीसांकडून या गुन्ह्यात मोक्का कारवाई केलेली आहे. परंतु, तपासात नावे निष्पन्न होतील, त्यानुसार कारवाई सुरू राहिल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे आमदरांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.

    पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी (४ जानेवारी २०२१) तानाजी भोईटे, निलेश रणजित भोईटे, विरेंद्रे भोईटे, अलका संतोष पवार, गिरीष दत्तात्रय महाजन (रा. जामनेर, जळगाव) यांच्यासह तब्बल २९ जणांवर भादवी कलम १२० (ब), ३३१, ३८४, ३७९, ४४७, ४४८, ४४९, ४५४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ५०४, ५०६ (२), ५११, १०९, ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. याबाबत अॅड. विजय भास्करराव पाटील (वय ५३) यांनी तक्रार दिलेली आहे.

    तक्रारदार अॅड. विजय पाटील यांना आरोपींनी कट व संगणमतकरून संस्थेची कागदपत्रे ताब्यात देतो, असे म्हणून पुण्यात बोलाविले. त्यानंतर त्यांना दमदाटी व शिवीगाळकरून संस्था ताब्यात देण्याकरिता दबाव आणला. तर, त्यांना एक कोटी घेऊन संस्था ताब्यात देण्यास सांगितले होते. संस्था ताब्यात न दिल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देखील दिली होती. त्यांना व साक्षीदारांना स्कोडा गाडीत डांबून पुण्यातील फ्लॅटवर जबरदस्तीने नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करून त्यांच्या पोटाला चाकू लावला. तसेच, त्यांचे कपडे काढून त्यांना डांबून ठेवले. संस्थेच्या सर्व संचालकांचे राजीनामे आणून न  दिल्यास व संस्था ताब्यात न दिल्यास एमपीडीएच्या गुन्ह्याच अडकविण्याची धमकी दिली होती. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून खंडणी स्वरूपात ५ लाख रुपये घेतले. त्यानंतर संस्थेत बेकायदेशीर प्रवेशकरून कागदपत्रे नेली असल्याचा गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा प्रथम जळगाव जिल्ह्यातील भिंगोरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. परंतु, गुन्हा पुण्यात घडल्याने तो पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग केला गेला होता. या गुन्ह्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्यानंतर या गुन्ह्यात पुणे पोलीसांनी मोक्का कारवाई केली आहे. परंतु, अद्याप अटक कोणाला करण्यात आलेली नाही.

    या गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्तांच्या विशेष पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी पैंकी तानाजी केशव भोईटे, महेंद्र वसंत भोईटे, लक्ष्मण प्रताप देशमुख, प्रमोद जयवंतराव काळे, निलेश रंजीत भोईटे यांच्याकडे कागदपत्रे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलीसांनी न्यायालयाकडून सर्च वारंट घेऊन सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या ४० जणांच्या पथकाने आज जळगाव व पुण्यातील या आरोपींच्या घर व कार्यालयावर छापेमारी केली आहे. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कारवाईत काही ठिकाणी पोलीसांना महत्वाची कागदपत्रे सापडली आहेत.  दोन्ही शहरात एकाच वेळी छापेमारी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण, एक पोलीस निरीक्षकांसह सात अधिकारी आणि तीस पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही छापेमारी केली आहे.
    या गुन्ह्यात आमदार गिरीश महाजन यांचे नाव आरोपींमध्ये असल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्यात आलेली आहे. तर, या कारवाईत आता आवश्यकतेनुसार अटकही केली जाणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.